16 वर्षांच्या मुलीचे अपहरण, दारु पाजून केला सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानातील कोचिंग सिटी अशी ओळख असणाऱ्या कोटा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे दोनदा अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला तिच्याच नातेवाईकाने आधी पळवून नेले. नंतर तिला दारू पाजून तिच्या भावोजी आणि त्याच्या भावाने सामूहिक बलात्कार केला. तरुणी तेथून पळून गेल्यावर आणखी एका तरुणाने तिला आमिष दाखवून पळवून नेले. तसेच तिला ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेला दोन्ही ठिकाणी तब्बल 18 दिवस ओलीस ठेवले होते. नंतर पीडित मुलगी कशीतरी तेथून निसटली आणि परत कोटाला पोहोचली. कोटा येथे पोलिसांनी मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले असून मुलीला तात्पुरता निवारा देण्यात आला आहे.

बालकल्याण समितीचे सदस्य मधु शर्मा यांनी सांगितले की, पीडित मुलगी नववीत शिकत आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी 3 जून रोजी उद्योग नगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीने सांगितले की ती 2 जून रोजी किराणा आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी वाटेत भावोजींचा भाऊ ऑटोमध्ये आला. त्याने तिला जबरदस्तीने आपल्याजवळ बसवले आणि बसस्थानकावर नेले. त्यानंतर तेथून बसने जयपूरला नेले. तेथे तिला एका निर्जन खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले.

यावेळी भोवोजींच्या भावाने तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. दोन-तीन दिवसांनी भावोजीही तिथे आला आणि म्हणाला की, तुझ्या बहिणीला मी सोडली आहे, आता मी तुझ्याकडून सूड घेईन. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एके दिवशी भावोजींचा भाऊ जेवण आणायला गेल्याची संधी पाहून ती तेथून पळून गेली.

दोघांच्या तावडीतून सुटल्यानंतर काही किलोमीटर चालत पीडित मुलीने स्टेशन गाठले. तेथे फलाटावर बसलेल्या एका तरुणाला कोटाला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारले. यावेळी या तरुणाने मुलीला ट्रेनमध्ये बसवून दुसऱ्या स्थानकावर नेले, त्यानंतर तेथून बसमध्ये तिला सीकर गावात नेले. तेथे त्याने मित्राला बोलावून दोघांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.