हिंदुस्थानच्या 16 वर्षीय प्रज्ञानंदची कमाल; जगज्जेत्या कार्लसनवर 36 चालीत मात

ओठावर मिसरूडही न फुटलेला 16 वर्षीय हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंद याने ‘वर्ल्ड नंबर वन’ जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर सनसनाटी विजय मिळवून बुद्धिबळविश्वात एकच खळबळ उडवून दिली. एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत प्रज्ञानंदने हा पराक्रम केला.

सोमवारी सकाळी झालेल्या या लढतीत प्रज्ञानंदने काळ्या सोंगटय़ाने खेळताना 5 वेळा बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पटकावणाऱया नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनवर 39 चालींमध्येच विजय संपादन केला. या विजयासह प्रज्ञानंद 12व्या स्थानावर पोहोचला. या हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टरच्या खात्यात आता 8 गुण जमा झाले आहेत. प्रज्ञानंदने याआधी केवळ लेव आरोनियनविरुद्ध विजय मिळविला होता. त्याने दोन लढती ड्रॉ केल्या, तर 4 लढतींत त्याला पराभव पत्करावा लागला.  प्रज्ञानंदने अनीश गिरी व क्वांग लीम यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडविल्या, तर एरिक हॅनसेन, डिंग लिरेन, जान ख्रिजस्टोफ डूडा व शखरियार मामेदयारोव यांच्याविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

इयान नेपोमनियाचची अव्वल

काही दिवसांपूर्वी कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपची लढत गमावलेला रशियाचा इयान नेपोमनियाचची हा 19 गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेत विजयी खेळाडू 3 गुणांची कमाई करतो, तर लढत ड्रॉ झाल्यानंतर एक गुण मिळतो. पहिल्या टप्प्यातील 7 फेऱयांचा खेळ अद्यापि शिल्लक आहे.

12व्या वर्षी तोडला होता आनंदचा विक्रम

आर. प्रज्ञानंदने 2018मध्ये म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी ग्रॅण्डमास्टरचा किताब जिंकून हिंदुस्थानचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदचा विक्रम मोडला होता. आनंदने वयाच्या 18व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर किताबाला गवसणी घातली होती. प्रज्ञानंदने याआधी 2016मध्ये यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर किताबाचा मान पटकाविला होता.