`लालबागचा राजा’च्या फायर सेफ्टीसाठी 17 लाख,रक्कम कमी करण्याची मंडळाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लालबागचा राजा’च्या ठिकाणी फायर सेफ्टीसाठी फायर इंजिन आणि कर्मचारी तैनात ठेवण्यासाठी पालिकेने मंडळाकडे १७ लाख २० हजार ९२३ रुपये भरण्यास पत्र पाठवले आहे. मात्र प्रतिवर्षी तीन लाखांवर फायर सेफ्टीसाठी भाडे आकारले जात असतान इतक्या मोठय़ा प्रमाणात रक्कम वाढवल्यामुळे मंडळाने रक्कम कमी करण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह देशभरातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी फायर सेफ्टी राखणे अनिवार्य असते. पालिकेकडून एक फायर इंजिन कर्मचाऱ्यांसह तैनात ठेवण्यात येते. यासाठी मंडळाकडून दरवर्षी तीन लाखांपर्यंत शुल्क भरण्यात येत होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून अग्निशमन दलाकडून १७ लाखांवर शुल्क भरण्याबाबत मंडळाला पत्र देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून ही भाडय़ाची रक्कम तीन लाखांवर आणली होती, मात्र या वर्षी अग्निशमन दलाकडून पुन्हा १७ लाखांवर भाडे भरण्यासाठी पत्र पाठवले आहे.

उपायुक्तांची भेट घेणार

लालबाग गणेशोत्सव मंडळाकडून शुल्क भरून गणेशोत्सवात दहा दिवसांसाठी पालिकेची फायर सेफ्टी सेवा घेण्यात येत आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून भाडय़ाच्या रकमेत केलेली वाढ कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे ही वाढ कमी करण्यासाठी संबंधित उपायुक्तांची भेट घेणार असल्याचे लालबाग गणेशोत्सव समितीचे सुधीर साळवी यांनी सांगितले.