
मुंबईतील कष्टकरी व कामगार वर्गातील तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तरुणांना रात्रशाळांमुळे शिकण्याची संधी मिळते. परंतु दुर्दैवाने पटसंख्येअभावी मुंबईतील 17 रात्रशाळा गेल्या चार वर्षांत बंद पडल्या. मुंबईतील मराठी माणूस उपनगरांमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढल्याने ही परिस्थिती ओढवली, असा आरोप विरोधी पक्षाने आज विधान परिषदेत केला.
काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 137 रात्रशाळा आहेत. त्यातील 120 कार्यरत असून 17 रात्रशाळा बंद झाल्या आहेत. या रात्रशाळांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी काही शिक्षक इतर शाळांमध्ये दिवसा नोकरी करत असतानाही त्यांना रात्रशाळांमध्ये दुबार नियुक्ती दिली जात असल्याबद्दल शिक्षक संघटनांनीही आपेक्ष घेतला आहे. त्याऐवजी पात्र बेरोजगार शिक्षकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली असल्याचे सरकारने मान्य केले.
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रश्नाला उत्तर देताना रात्रशाळा बंद झाल्या हे खरे असले तरी त्याची सांगड स्थलांतराशी घालता येणार नाही, असे सांगितले. रात्रशाळांमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेकडे विचारणा करून निर्णय घेतला जाईल. अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना अन्य शाळांमध्ये सामावून घेतले जाईल असे आश्वासन भोयर यांनी दिले.
नाईट हायस्कूलचा दर्जा सुधारा – अभ्यंकर
रात्रशाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी नाईट हायस्कूलचा दर्जा सुधारला पाहिजे. काwशल्य विकास आधारित अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. शाळा बंद झाल्याने शिक्षक अतिरिक्त झाले असतील तर त्यांना दिवसशाळांमध्ये सामावून घेतले पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केली.




























































