
कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज व्हेजीटेबल अॅन्ड जनरल मार्केट (भाजी मंडई) या मार्केटमधील 18 गाळेधारकांची डिपॉझिटच्या रकमेपैकी काही रक्कम (रुपये 22,01,700) येणे बाकी होती. याबाबत नगरपरिषदेने वारंवार सूचना देवूनही गाळेधारक शिल्लक डिपॉझिटची रक्कम भरत नव्हते. त्यामुळे त्यांना 22 जून 2020 रोजी नोटीस देवून उर्वरित डिपॉझिटची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले होते. एका गाळाधारकाने रक्कम भरल्याने उर्वरित 17 गाळे सील करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली आहे.
नोटीसप्रमाणे 3 गाळेधारकांनी शिल्लक डिपॉझीटपैकी ( 2,36,000 रुपये) इतकी रक्कम भरली. त्यामुळे उर्वरित थकीत डिपॉझीट रक्कम (19,65,700 रुपये) येणे बाकी राहिल्याने बुधवारी नगरपरिषदेने 18 गाळयांवर जप्तीची कारवाई सुरु केली. कारवाई सुरु असताना 1 गाळाधारकाने रोख रक्कम ( 75,000 रुपये) भरली. तसेच उर्वरित 17 गाळेधारकांचे गाळे नगरपरिषदेने बुधवारी सील केले आहेत. ही कारवाई मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक उमेश महादर, लिपीक अल्ताफ मांगलेकर, पांडुरंग सपकाळ, गणेश दुबळे, विनोद भोसले, शिपाई राजेश जाधव कर्मचा-यांनी केली. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त होता.































































