भयंकर! स्वयंपाकघरातून निघाले 17 विषारी नाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातील एका घरात अत्यंत भीतीदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ज्या कुटुंबात ही घटना घडली आहे त्या घरातील सदस्यांचाही भीतीने थरकाप उडाला आहे.

अलीपूरद्वार जिल्ह्यातील कुमारगाव येथील खोवादंगा गावात ही घटना घडली आहे. येथे राहणारी सुबीर बाबू ही महिला स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. भात शिजवण्यासाठी तांदूळ धुवून तिने भाताचं पातेलं गॅसवर ठेवलं. इतक्यात तिचं लक्ष स्वयंपाकघरातील शेगडीच्या बाजूला असलेल्या भिंतीतील एका कपारीकडे गेलं. या कपारीतून एक एक करत 17 काळ्या रंगाचे अत्यंत विषारी नाग बाहेर येत होते. नागांवर ज्या क्षणी तिची नजर पडली त्या क्षणी झटकन स्वयंपाकघरातून धावतच बाहेर आली.

या घटनेबाबत सुबीर बाबू सांगते की, थोड्याच वेळात नागांनी अख्ख स्वयंपाकघर भरून गेलं होतं. त्यामुळे प्रचंड घाबरलेली आणि भीतीने थरथर कापत असलेली ही महिला मदतीकरिता मोठमोठ्याने ओरडू लागली. तिच्या ओरडण्यामुळे आजूबाजूचे लोक धावतच तिच्या घरी आले. त्यांनी याबाबत सर्पमित्रांना माहित दिली.

2 सर्पमित्रांनी या नागांना स्वयंपाकघरातून बाहेर काढले. स्वयंपाकघरातील 8 नागांचे प्राण त्यांनी वाचवले. त्यानंतर जिथून हे नाग बाहेर पडत होते. ती जागा खोदण्यात आली तिथून आणखी 5 जिवंत नाग सापडले. त्यानंतर खोदलेल्या जागेवर पाणी टाकले त्यातून अजून 4 नाग बाहेर आले. या नागांना जीवदान देणारे सर्पमित्र रोहित आणि मानवेंद्र यांनी सांगितले की, ही नागाची पिल्ले फक्त 2 दिवसांचीच होती. उष्णतेमुळे ती पटापट बाहेर येत होती, मात्र ती अत्यंत विषारी आहेत. नागाच्या पिल्लांना सर्पमित्रांनी सुरक्षित स्थळी सोडले आहे.