
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ठाणे, सातारा अशा 18 जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी होम आयसोलेशन ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी सुविधा निर्माण करण्याचे आदेश आज राज्य सरकारने दिले. राज्यातील शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागातील संसर्ग वाढत असल्याबद्दल यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.
कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व अन्य उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आशा वर्करना प्रशिक्षण द्यावे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोराना चाचणीवर भर द्यावा तसेच कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याचे नियोजन करावे, असे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
हाफकिनमार्फत निर्मिती
म्युकरमायकोसिसचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरू केल्यास हा आजार बरा होतो. हाफकिन इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकरमायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून औषधे येतील. त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
मोफत उपचार
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱया 131 रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी
कोरोना लढय़ाला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील 25 टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
रुग्णाच्या बिलांची तपासणी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेची तयारी करताना ग्रामीण भागातसुद्धा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना त्यांनी केली. तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ञांची टीम तयार ठेवावी. खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करावी, तसेच राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.
सरसकट नको, फोकस टेस्टिंग करा!
सरसकट चाचण्या करणे टाळायला हवे. बाधितांच्या जवळच्या ज्या रुग्णांना सर्वाधिक धोका आहे तसेच ज्यांना कमी धोका आहे, अशांच्याच चाचण्या करण्यात याव्यात. जनरल टेस्टींग टाळून फोकस टेस्टिंगवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण जाहीर करा!
लसींच्या ग्लोबल टेंडरसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अद्याप कोणत्याही राज्याच्या लसींच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करावे. केंद्राने लस खरेदी करावी. आम्ही पैसे देऊ, असे टोपे म्हणाले.
डेंजर झोन
सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धाराशीव, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, नगर, लातूर.































































