मुंबईत आढळले 2.25 लाख दुबार मतदार, 11 लाखांपैकी आतापर्यंत 1.12 लाख प्रकरणांची तपासणी

राज्याच्या निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेकडे पाठवलेल्या 11 लाख 1 हजार दुबार नावांच्या तपासणीत 2.25 लाख दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. एकूण दुबार नावांपैकी 50 टक्के नावांची तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीत 41 हजार 57 नावे एकाच वॉर्डमध्ये असल्याचे समोर आले आहे. ही तपासणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी आज दिली.

राज्य निवडणूक आयोगाने मुंबईत 11 लाख 1 हजार दुबार मतदार असल्याचे दर्शवले होते. यानुसार ‘बीएलओ’ आणि पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करीत आहेत. मतदारांना त्यांचे नाव डुप्लिकेट म्हणून का चिन्हांकित झाले हे समजावून सांगण्याचे कामदेखील सुरू आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डात अडीचशे कर्मचारी, अधिकाऱर्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही जोशी यांनी दिली. दुबार नावांबाबत गृहभेटीत कर्मचारी मतदाराकडून परिशिष्ट-1 भरून घेत आहेत. एखादा मतदार स्थळ निरीक्षण अंती घरी उपलब्ध नसल्यास त्यांच्या घरावर सूचना चिकटवण्यात येईल. संबंधितांनी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यावेळी करनिर्धारण व संकलन सह आयुक्त विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त  डॉ. गजानन बेल्लाळे यावेळी उपस्थित होते.

साडेअकरा हजार हरकती, सूचना

मुंबई महानगरपालिने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर 11 हजार 668 तक्रारी दाखल झाल्या असून यातील 10 हजार 668 तक्रारीबाबत निर्णय देण्यात आला आहे. तर 829 तक्रारी दुबार नावांबाबत आल्या असून त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. प्रभाग प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती सूचनांवर निर्णय देण्याकरिता प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱयांनी दिलेल्या निर्णयानुसार, अंतिम मतदार यादीच्या अनुषंगाने पंट्रोल चार्टतयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

11 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एकूण 11.11 लाख दुबार नावांपैकी अजून 8.76 लाख नावे तपासायची बाकी आहेत. प्रत्यक्ष दुबार नावे फक्त 15 ते 20 टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर पालिकेला 11,497 सूचना व आक्षेप प्राप्त झाले होते. त्यापैकी 10,668 प्रकरणांचा निपटारा झाला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.