बदनापूरजवळ चिखली दाभाडी मार्गावर अडीच लाखांचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद असताना आडमार्गाने गुटखा विक्रीसाठी नेत असताना चिखली- दाभाडी या रस्त्यावर बदनापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून 2 लाख 80 हजाराचा 20 बॅग गुटखा व एक कार जप्त करून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी असून जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने जमावबंदी व अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीला बंदी आहे. लॉकडाऊनच्या काळात अवैध गुटखा विक्री सुरूच असून मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी असल्यामुळे गुटखा विक्री करणारे आडमार्गाचा वापर करत असल्याचे आढळून येत आहे. चिखली ते दाभाडी या रस्त्यावर एक मारुती डिझायर कारमधून चोरटी गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक मारुती खेडेकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बदनापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत या रस्त्यावर दाभाडी बिटचे पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण यांनी राजूरकडून येणाऱ्या या कारला थांबवले.

कारचालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कारची डिक्की तपासली असता त्यात गुटखा ठेवल्याचे आढळले. हे वाहन बदनापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक खेडकर यांनी तपासणी केली असता कारमध्ये राज्यात विक्रीला करण्यास बंदी असलेला गुटखा असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी अन्न व औषधी कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. अन्न व औषधी विभागाचे अधिकारी जालन्याहून बदनापूर येथे दाखल झाल्यानंतर कारमधील गुटखा बाहेर काढण्यात आला. या वेळी 20 गोण्या भरून हा गुटखा असल्याचे दिसून आले. या गुटख्याची किंमत 2 लाख 80 हजार इतकी असून बदनापूर पोलिसांनी कार आणि गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी चालकाची चौकशी केल्यानंतर हा गुटखा राजूर परिसरातून आल्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, अनिल चव्हाण, यांच्या पथकाने थेट राजूर येथे धडक मारुन शोध घेऊन आरोपी निसार अनिस सिद्दीकी( रा. भोकरदन), संदीप भूमकर (रा. राजूर) याला पकडून गुन्हा दाखल केला आहे. बदनापूर पोलिसांनी आडरस्त्याने वाहतूक होणारा गुटखा व त्यातील आरोपींना अवघ्या 4 तासात अटक केली आहे.