अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वीटभट्टीत जिवंत जाळलं, दोन सख्ख्या भावांना मृत्युदंडाची शिक्षा

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील पॉस्को न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कालू आणि कान्हा अशी आरोपींची नावे आहेत. तर पुरावे नष्ट करण्याचा आरोप असणाऱ्या सात आरोपींना मुक्त केले आहे. मात्र या निर्णयाविरोधात फिर्यादी पक्षाने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

भिलवाडा येथे गतवर्षी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला वीटभट्टीत जीवंत जाळण्यात आले होते. याप्रकरणाची सुनावणी पॉस्को न्यायालयात सुरू होती. सोमवारी न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी मानत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, अशी माहिती विशेष सरकारी वकील महावीर सिंग किशनावत यांनी दिली.

जनावरं चारण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलगी गतवर्षी 2 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. कालू आणि कान्हा या दोघांनी तिचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केला आणि तिला वीटभट्टीमध्ये जाळून मारले होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर हे प्रकरण भिलवाडा जिल्ह्यातील पॉस्को न्यायालयात सुनावणीला आले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी कालू आणि कान्हा या भावांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

पोलीस चौकशीमध्ये आरोपींना गुन्हा कबूल केला होता. मुलीवर बलात्कार केल्यानंतर डोक्यावर वार करून तिला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिला वीटभट्टीत भेकले. एवढेच नाही तर तिच्या शरिराचे काही तुकडे तलावात फेकल्याचीही कबुली आरोपींनी दिली. पोलीस तपासात वीटभट्टीमध्ये मुलीच्या हातातील बांगड्या आणि हाताच्या पंजाची हाडं सापडली होती.