पंजाबच्या संगरुर तुरुंगामध्ये गँगवॉर, धारदार हत्याराने वार करत दोन कैद्यांचा खून

पंजाबच्या संगरुर तुरुंगामध्ये कैद्यांच्या दोन गटांमध्ये गँगवॉर भडकले. यात धारदार हत्याराने वार करत दोन कैद्यांचा खून करण्यात आला असून दोघे जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी पटियाळाला रेफर करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

संगरुर तुरुंगामध्ये कैद्यांच्या दोन गटामध्ये झालेल्या या गँगवॉरमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली असून तुरुंग प्रशासन आणि संगरुर पोलिसांनी याचे चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली.

संगरुर तुरुंगामध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान कैद्यांची मोजदाद झाल्यानंतर त्यांना बॅरेकमध्ये बंद केले जात होते. त्याचवेळी एका बॅरेकमधून जवळपास 10 कैदी बाहेर आले आणि त्यांनी दुसऱ्या बॅरेकमधील 4 कैद्यांवर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केला. हल्ला झालेले आणि हल्ला केलेले कैदी आधी एकाच बॅरेकमध्ये होते. यादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान खूनी हल्ल्यात झाल्याची माहिती मिळतेय.

खून हल्ल्यानंतर चारही कैदी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केली आणि त्यानंतर त्यांना संगरुरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी दोन कैद्यांना मृत घोषित केले. हर्ष आणि धर्मेंद्र अशी मृत कैद्यांची नावे आहेत. तर गगनदीप सिंग आणि मोहम्मद शाहबाज नावाचे दोन कैदी गंभीर जखमी झाले असून त्यांना पटियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

दरम्यान, डीआयजी सुरेंद्र सैनी यांनी यांनी प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करू असे म्हटले आहे. तुरुंगामध्ये कैद्यांकडे धारदार शस्त्र आलेच कसे? याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.