पुण्यात ‘एटीएम सिस्टीम’हॅकचा पर्दाफाश; दोन नायजेरियन नागरिकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएम मशीनमध्ये अतिरिक्त डिव्हाईस बसवून यंत्रणा हॅक करून बँकेची फसवणूक करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली. त्यांच्याकडून 7 मोबाईल, 3 लॅपटॉप, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. डेव्हीड चार्लस (वय 30) अणि केहिंडे सादिक इदरिस (वय 29, रा. उंड्री ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरातील विविध भागातील एटीएम सेंटरमध्ये अतिरिक्त डिव्हाईस बसवून संबंधित बँकेची सिस्टीम हॅक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सिस्टीम हॅक करून एटीएम सेंटरमधील संपुर्ण पैशांचा ट्रे रिकामा केला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास करून आरोपी वापरत असलेल्या दुचाकीची माहिती काढली. त्यानंतर कोंढव्यातील एका इमारतीत छापा टाकून डेव्हीडला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने साथीदार केहिंडे याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, नीतेश शेलार, अनिल पुंडलिक, नवनाथ जाधव, राजकुमार जाबा, शाहरूख शेख, नीलेश लांडगे, दीनेश मरकड, सचिन वाजे, योगेश व्हावळ, अनुप पंडित, ज्योती दिवाणे, पुजा मांदळे, सुनीता जाधव यांच्या पथकाने केली.