पूंछमध्ये चकमकीत जखमी झालेल्या 2 जवानांचे निधन, 7 दिवसात 9 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत हिंदुस्थानी लष्कराचे जवानांची चकमक झाली. या चकमकीमध्ये आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहेत. चकमकीमध्ये जखमी झालेल्या दोन जवानांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. विक्रमसिंह नेगी आणि योगंभर सिंग अशी या जवानांची नावे आहेत. याबाबत जम्मू सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

खोऱ्यामध्ये दहशतवादाविरोधातील मोहीम अद्यापही सुरू आहे. पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये जखमी झालेल्या दोन जवानांचे आज निधन झाले, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. तसेच जंगलामध्ये अद्यापही दहशतवादी लपून बसलेले आहेत त्यामुळे जवान फुंकून फुंकून पाऊल टाकत आहेत. दहशतवादी लपून-छपून गोळीबार करत असून गुरुवारपासून ही चकमक सुरू असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये 9 जवान शहीद झाले आहेत. याआधी पूंछ जिल्ह्यातील सुरणकोटच्या डेरा की गली भागात सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळताच रविवारी मध्यरात्रीपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यात पाच जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांनमध्ये नायब सुभेदार जसविंदर सिंग, नायक मनदीप सिंग, गज्जन सिंग, सरज सिंग, जवान वैशाख यांचा समावेश आहे. चकमकीनंतर दहशतवादी चरमेरच्या जंगलात पळून गेले.