
नगर शहरामध्ये तोफखाना व कोतवाली हद्दीमध्ये भरदिवसा चोरीच्या दोन घटना घडल्या असून आठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तोफखाना हद्दीमध्ये सादिक शेख (रा. नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख हे कोटक महिंद्रा बँकेमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पाच लाख रुपये भरण्यासाठी मोटरसायकलवरून त्या ठिकाणी गेले असता त्यांनी गाडी बाजूला लावली होती. बँकेमध्ये जाण्यापूर्वीच त्यांच्या डिकीतून पाच लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तात्काळ पोलीस पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलिसांचे दोन ठिकाणी पथक तपास करण्यासाठी पाठवले आहे. मात्र अद्यापपर्यंत माहिती हाती लागलेली नाही. शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
कोतवाली हद्दीमध्ये मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमाराला बुरुडगाव रोड परिसरातून एका वकिलाची बॅग चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. अॅड. अशोक गांधी यांची ही बॅग आहे. गांधी बुरुडगाव रोड येथे राहत आहे. त्यांचे या ठिकाणी ऑफिस आहे. मंगळवारी 12.15 वाजण्याच्या सुमारास ते घरातून ऑफिसमध्ये आले व त्यानंतर ते तात्काळ मार्केट यार्डमधील मर्चंट बँकेमध्ये गेले. मर्चंट बँकेमध्ये त्यांनी त्यांच्या लॉकरमधून तीन लाख रुपये रोख स्वरूपामध्ये काढले होते. यामध्ये पाचशे रुपयांच्या अडीच लाख रुपयांच्या नोटा होत्या. उर्वरित रक्कम ही शंभर व दोनशे रुपयांच्या नोटा होत्या. कापडी बॅगेमध्ये ते पैसे घेऊन मर्चंट बँकेतून त्यांच्या ऑफिसच्या दिशेने निघाले असताना ऑफिसजवळ गेल्यावर त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरांनी त्यांची कापडी पिशवी हिसकावून घेत पोबारा केला व बॅगेतील तीन लाख रुपये चोरून नेले.चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते.
या घटनेबाबत गांधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक पाठवले आहे. नगर शहरामध्ये चोरीच्या घटना वाढत असून दिवसाढवळ्या अशा प्रकारच्या चोर्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे .चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.

































































