
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. त्यामुळे प्रेमाच्या नात्यात वयाची बंधन गळून पडलेली दिसतात. पण, पारंपरिक विचार करणाऱ्या व्यक्तीला ते खटकू शकतं आणि ती व्यक्ती टीकाही करू शकते. असंच काहीसं झालंय ते अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या बाबतीत. नवपरिणित नेहाला तिच्या नवऱ्याच्या वयावरून ट्रोल व्हावं लागलं आहे. कारण नेहा धुपिया(३७) आणि अंगद बेदी(३५) यांच्यात दोन वर्षांचा फरक आहे.
नेहाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अंगदचा एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो तिने त्याच्या आगामी सूरमा या चित्रपटासाठी शेअर केला होता. या पोस्टखाली तिच्या चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. पण, काही जण तिला ट्रोल करताना दिसले.
एका युजरने तिला “तुझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे अंगद बेदी. नवरा नाही तर भाऊ आहे तुझा….. राखी बांध त्याला.” असा सल्ला दिला. यावर गप्प बसेल ती नेहा कुठली. तिने त्याला सडेतोड उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं. “तुझ्या सल्ल्यासाठी धन्यवाद. आता एक कृपा कर, फक्त स्वत:च्या आयुष्यावर लक्ष दे.” असं नेहाने त्याला सुनावलं. नेहाच्या या उत्तराचं अनेक चाहत्यांनी समर्थन केलं.




























































