
आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या ‘रक्तदान करा, प्लाझ्मा दान करा, वारंवार करा आणि जीव वाचवा’ या संकल्पनेवर आधारित जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या सभागृहात मुंबई रक्त केंद्रातील 20 शतकवीर रक्तदात्यांचा गौरव सोहळा नुकताच पार पडला. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक रमाकांत बिरादार यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
कार्यक्रमाला संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, सहाय्यक संचालिका (रक्त संक्रमण सेवा) अपर्णा पवार उपस्थित होते. ‘या दिवसाच्या निमित्ताने, निरोगी व्यक्तींनी केवळ एकदाच रक्तदानासाठी येऊन चालणार नाही तर नियमित रक्तदाता होण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे’ असे आवाहन रमाकांत बिरादार यांनी केले. रक्तदानाचा वसा हा तरुण पिढीने पुढे चालविला पाहिजे. जसे की तरुण पिढीचा कल जिममध्ये जास्त आहे तसाच तो रक्तदानाच्या कार्यामध्ये कल वाढला पाहिजे. रक्तदानाबरोबरच प्लेटलेट दान, अवयव दान आणि देहदान यातही पुढाकार घ्यावा. ही काळाची गरज आहे, असे मनोगत शतकवीर रक्तदात्यांनी व्यक्त केले.
शतकवीर रक्तदाते
राजेंद्र कुलकर्णी, संजय लवांडे, गणेश आमडोसकर, मनीष सावंत, संतोष केळकर, प्रसाद मोकाशी, विठ्ठल शितोळे, सतीश सावंत, विलास घाडीगावकर, गजानन नार्वेकर, डॉ. प्रागजी वाझा, प्रशांत म्हात्रे, दिव्या चंडोक, डॉ. अविनाश सुपे, तरुण भगत, हिरोस खंबाटा, संजय डोबके, विश्वेष झालेले, मंतोष मिश्रा, किरण राजुरकर.




























































