
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप विसाव्या दिवशीही सुरूच होता. यादरम्यान, शिवशाही बसेसच्या पुण्याकडे 20 फेऱ्या झाल्या, तर 40 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्कर, मेढा, पारगाव-खंडाळा, फलटण, दहिवडी, कडूज, कोरेगाव या 11 आगारांतील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. गेल्या वीस दिवसांपासून शिवशाही बस वगळता लालपरी आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सातारा आगारातून 11 शिवशाही बसेसच्या 20 फेऱ्या पुण्याकडे झाल्या. या फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली. आतापर्यंत 34 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 180 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर 40 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेवगाव आगाराच्या तीन बसवर दगडफेक
सरकारने पगारवाढ जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. शेवगाव आगारातील कामगारांनी शुक्रवारी संप मागे घेतला. मात्र, आज तीन बसवर दगडफेक करण्यात आली आहे. शेवगावकडून नगरकडे जाणाऱ्या बसवर अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली. श्रीरामपूरकडे जाणाऱ्या बसवर सौंदळा (ता. नेवासा) येथे, तसेच पैठणकडे जाणाऱ्या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे जखमी झाले आहेत.



























































