
उपाहारगृहाच्या परवान्यावरील नाव बदलण्यासाठी 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 20 हजार रुपये घेताना पालिकेच्या एच/पूर्व वॉर्डाचे स्वच्छता अधिकारी रंगेहाथ ट्रप झाले. जगदीश थोपटे असे त्या अधिकाऱयाचे नाव आहे.
मानसिंग (नाव बदललेले) हे नागरिकांना शासकीय कार्यालयातून विविध प्रकारचे परवाने मिळवून देतात. त्यांनी मार्च महिन्यात एका उपाहारगृहाच्या परवान्यावरील नाव बदलण्यासाठी जगदीश थोपटे यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी थोपटे यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर 50 हजार रुपये घेतले होते. मात्र तरी देखील त्यांनी मानसिंग यांचे काम केले नाही. त्यामुळे मानसिंग पुन्हा थोपटे यांना जाऊन भेटले असता थोपटे यांनी परत 30 हजारांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती 20 हजार द्यायचे ठरले. मात्र मानसिंग यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार आवश्यक खातरजमा केल्यानंतर अॅण्टी करप्शन ब्युरोने सोमवारी ट्रप लावला असता स्वच्छता अधिकारी जगदीश थोपटे हे 20 हजार घेताना रंगेहाथ सापडले.





























































