कोल्हापूरात 200, सांगली 112 केंद्र बंद, साताऱ्यात लसीकरण ठप्प, पश्चिम महाराष्ट्रात लसींचा साठा संपला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. या लसीकरणात खंड पडला असून, पश्चिम महाराष्ट्रातील लसीचा साठा संपला आहे. कोल्हापूरमधील 200, सांगलीतील 112 केंद्रे बंद करावी लागली आहे. तर साताऱ्यातही लसीकरण ठप्प झाले आहे. नगर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लससाठा शिल्लक असून, सोलापुरात साडेसहा लाख डोस मिळण्याची मागणी करण्यात आली असली तरी गुरुवारी फक्त 19 हजार 500 डोस मिळाले आहेत.

कोल्हापूरात 200 केंद्र बंद

राज्यात कोविड लसीकरणात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना गुरुवारी जिल्ह्यातील लसीचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे दुपारनंतर 226 पैकी 200 हून अधिक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीचे डोस देण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 19 केंद्रांसह जिल्ह्यात 226 हून अधिक केंद्रांवर लस देण्यात येत आहेत.
जिल्ह्यात 49 हजार 20 कोव्हॅक्सिन आणि 5 लाख 57 हजार कोविशिल्ड डोस प्राप्त झाले होते. मार्चअखेर लसीकरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांनाही डोस देण्यात येत आहे. लसीकरण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे मंगळवारी तब्बल 35 हजारजणांना लस देण्यात आली. त्या तुलनेत
जिल्ह्यात केवळ 19 हजार लसींचा साठा शिल्लक होता. गुरुवारी सकाळपर्यंत हा साठाही संपला. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात 19 पैकी केवळ दोनच केंद्रांवर सुरू असलेले लसीकरण सायंकाळी बंद झाले.
जिल्ह्यात सध्या एकही डोस शिल्लक नाही. तातडीने एक लाख डोसची मागणी केली होती, पण मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गुरुवारी
जिल्ह्यात 19 हजार डोस शिल्लक होते. ते संध्याकाळी संपले त्यामुळे सायंकाळी बहुतांश केंद्रे बंद केली. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज 35 हजारांप्रमाणे आठ दिवसांसाठी 2 लाख 80 हजार कोरोना प्रतिबंधक डोसची मागणी करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांत डोस प्राप्त होतील.
– डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकाऱी
सांगलीत लस संपल्याचे फलक
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. अनेक लसीकरण केंद्रांबाहेर लस उपलब्ध नसल्याचे फलक लावल्यामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांना घराकडे परतावे लागले.
सांगली जिल्ह्यासाठी 2 लाख 73 हजार लसींचे डोस उपलब्ध झाले होते. लस उपलब्ध झाल्यापासून गुरुवारी अखेर दोन लाख 63 हजार 590 लोकांचे लसीकरण झाले. जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह लसीकरणाची 225 केंद्रे आहेत. बुधवारी जिल्ह्यातील 112 केंद्रांवर लस संपल्याने लसीकरण थांबले आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असताना लस संपल्याने नागरिकांत संभ्रमावस्था आहे.
सांगली जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी लसीचे सर्व डोस संपले आहेत. जिल्ह्यातील 45 वर्षांवरील लोकसंख्या पाहाता आणखी दोन लसींची मागणी करण्यात आली आहे. या लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल.
– डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
दररोज 20 हजार जणांना लस
जिल्ह्यात दररोज 20 हजार जणांना लस देण्यात येत आहे. लसीकरणाचा हा वेग पाहाता जिल्ह्याला आणखी दोन लाख लसींची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. सध्या जिल्ह्यात अवघे 28 टक्के लसीकरण झाले आहे. गुरुवारी अखेर लसींचे पूर्ण डोस संपलेले आहेत. काही खासगी दवाखान्यांच्या लसीकरण केंद्रांत थोडय़ा-फार लसी उपलब्ध असतील. मात्र, लसीकरण पूर्णपणे थांबले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पोरे यांनी सांगितले.

नगरमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच साठा

जिल्ह्यात कोरोना लसीचे डोस संपत आले असून, दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 12 हजार 150 डोस उपलब्ध झाले. त्यामध्ये कोविडची लस 2 लाख 58 हजार, तर कोव्हॅक्सिन 54 हजार 60 एवढी प्राप्त झाली आहे. आता हे डोस संपत आले असून, दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. नगर जिल्ह्यात कोरानाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज 2 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम जोरात सुरू होती.
त्यानुसार नगर जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 413 जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे 37 हजार 325 महसूल 2 हजार 161 पोलीस 5 हजार 348, पंचायत समिती 6 हजार 332, गृह व शहरी कामकाज 4 हजार 82, रेल्वे सुरक्षा दल 347, 45 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिक 2 लाख 19 हजार 818 यांनी नोंदणी केली होती.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 27 हजार 404 जणांना पहिला, तर 26 हजार 655 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 59 जणांना लस देण्यात आली आहे. पहिलाच डोस देण्याची टक्केवारी 82.57 टक्के आहे, तर दुसऱ्या लसेची टक्केवारी 9.68 टक्के आहे.
नियमाप्रमाणे शासनाकडे लस देण्याची मागणी केली आहे. गुरुवारी आम्हाला 25 हजार डोस मिळाले आहेत. दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे.
– प्रकाश लाळगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.

साताऱ्यात अनेकजण घरी परतले

जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा संपला असून, नवीन साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरणाची मोहीम थांबवावी लागत आहे. लसींची मागणी केली असून, उपलब्ध होताच प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये लसीकरणाची मोहीम पुन्हा वेगाने पुढे सुरू करण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
1 एप्रिलपासून जिल्ह्यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले. याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आता लस संपल्या आहेत. सातारा जिल्ह्यासाठी गुरुवारी अखेर 3 लाख 2 हजार लसी आल्या होत्या. लसीकरणाचा प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्ह्यासाठी आलेल्या लसींचा साठा आता संपला आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितल
सातारा जिल्ह्यात लसींचा साठा संपला असून, पुण्याला लस मिळण्यासाठी मागणी नोंदवली आहे. लस येतील या प्रतीक्षेत आम्ही आहोत. लस उपलब्ध होताच मोहीम पुढे सुरू होईल.
– डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारे.