मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; 200 मैतेई लोकांनी घरे सोडली, अनेकांनी जंगलात केले पलायन

मणिपूरमध्ये वृद्धाच्या हत्येमुळे हिंसाचार उसळला आहे. 59 वर्षीय सोइबाम सरतकुमार सिंग असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह आढळला असून त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने जखमा केलेल्या होत्या. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जिरीबाम पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडून घेतलेली परवानाधारक शस्त्र त्यांना परत करावीत, अशी मागणी केली. जिह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी इंफाळमध्ये उपस्थित असलेल्या राज्य पोलीस कमांडो अधिकाऱयांना शनिवारी जिरीबामला पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. हिंसाचारामुळे 200 हून अधिक मैतेई लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

हिंसाचाराचा मास्टर माइंड अटकेत

मणिपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार थोंग्मिन्थांग हाओकिप ऊर्फ थांग्बोई हाओकिप ऊर्फ रोजर याला 6 जून रोजी इंफाळ विमानतळावरून पकडण्यात आले. एनआयएने गेल्या वर्षी 18 जुलै रोजी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

कुकी अतिरेक्यांवर हत्येचा आरोप

मणिपूर अजूनही अशांत आहे. जिरीबाम जिह्यातील सोरोक अटिंगबी खुनौ येथील सोइबाम शरतकुमार यांना गुरुवारी कुकी अतिरेक्यांनी ठार मारले. एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारामुळे जिरीबाम जिल्हा कमी-अधिक प्रमाणात त्यापासून बाजूला राहिलेला आहे. मात्र या घटनेने जिह्यात खळबळ उडाली आहे. जाळपोळ आणि जातीय संघर्षाची भीती निर्माण झाल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.