अकोल्यात आढळले कोरोनाचे 22 रुग्ण, पाच जणांचा मृत्यू

709

अकोल्यात रविवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे 100 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 78 अहवाल निगेटीव्ह तर 22 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर सायंकाळी 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील नऊ जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर  उर्वरित तीन जणांना घरी सोडण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1007  झाली आहे. आजअखेर 319 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण 7311 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 7009, फेरतपासणीचे 118 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 184 नमुने होते. आजपर्यंत एकूण 7259 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 6252 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 1007 आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आज 22 पॉझिटिव्ह

आज सकाळी प्राप्त अहवालात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 15 पुरुष आहेत. त्यातले मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फ़ैल, तार फ़ैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आजच्या अहवालातील एक रुग्ण हा मंगरूळ पीर जि.वाशीम येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू आहेत.

पाच जणांचा मृत्यू

आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली त्यात- अकोट फ़ैल येथील 68 वर्षीय महिला असून हीमहिला दि. 3 रोजी दाखल झाली होती. तर शंकर नगर येथील 53 वर्षीय पुरुष हा दि. 10 रोजी दाखल झाला होता. बाळापूर येथील 55 वर्षीय महिला दि.13 रोजी दाखल झाली होती. बापूनगर येथील 58 वर्षीय पुरुष  दि.3 रोजी  दाखल झाला होता.  त्याचा आज पहाटे मृत्यू झाला. तर सिंधी कॅम्प येथील 56 वर्षीय पुरुष हा दि.12 रोजी  दाखल झाला होता व हा  रुग्ण आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

12 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील तिघांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरीत नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला व पाच पुरुष रुग्ण आहेत. त्यातील पाच जण तापडीया नगर येथील, दोन जण गुलजारपुरा येथील तर उर्वरीत  अकोट फैल,  तार फैल, सिंधी कॅम्प,  शिवाजीनगर, खदान  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

319 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत 1007 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 51 जण (एक आत्महत्या व 50 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या 637 आहे. तर सद्यस्थितीत 319 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या