
सामना प्रतिनिधी । मुंबई
मालाड पिंपरीपाडा येथे जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून तब्बल 22 जण ठार झाल्याची घटना आज घडली. मध्यरात्री 1 वाजता अचानक 12 झोपडय़ांवर भलीमोठी भिंत कोसळल्याने एकच हाहाकार उडाला. यामध्ये वडार समाजाची कुटुंबे ढिगाऱयाखाली अक्षरशः गाडली गेली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, मृतांची ओळख पटवणेही मुश्कील झाले होते. दरम्यान, अनेक जण गंभीर जखमी झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मालाडमध्ये जलाशयासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी सुमारे 35 फूट उंचीची ही भिंत बांधली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱया जोरदार पावसामुळे या टेकडीवरून मोठय़ा प्रमाणात पाणी साचून भिंत कमजोर होऊन कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी वडार समाज गेल्या अनेक वर्षांपासून कच्च्या बांधकामाच्या घरात राहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या परिसरात सुमारे 17 कुटुंबे वास्तव्याला होती. यातील 10 ते 12 झोपडय़ांवर काही अंतराच्या फरकाने दोन ठिकाणी भिंत कोसळली. मध्यरात्री ही घटना घडल्याने कुटुंबातील सर्व सदस्य घरात असल्यामुळे दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस यांच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले, मात्र रात्रीचा अंधार आणि जोरदार पावसामुळे बचावकार्यावर काही प्रमाणात अडथळे आले. सकाळपासून वेगाने करण्यात आलेले बचावकार्य सायंकाळपर्यंत सुरू होते. दरम्यान, जखमींवर कांदिवलीचे शताब्दी रुग्णालय, जोगेश्वरीचे ट्रॉमा केअर सेंटर आणि मालाडच्या एम. व्ही. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालिकेकडून पाच लाखांची मदत
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पालिकेने पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. शिवाय जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. संबंधित रहिवासी राहत असलेली जमीन ही वन खात्याच्या मालकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई होणार
संबंधित भिंत तीन वर्षांपूर्वीच बांधण्यात आली होती. तरीदेखील ही भिंत कोसळलीच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकाराची चौकशी करण्यात येणार असून जे या दुर्घटनेस जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
गरज असेल तरच घराबाहेर पडा
मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली असताना पुढील 24 तासांत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा पालिकेने दिला आहे.
म्हणूनच पाणी साचले
– मुंबईत 50 मि. मी. पाऊस झाल्यास हे पाणी सहजपणे वाहून नेण्याची क्षमता उपलब्ध यंत्रणेमध्ये आहे. मात्र मुंबईत गेल्या तीन दिवसांत तब्बल पूर्ण जून महिन्यात होणारा पाऊस पडला आहे. कुलाबा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दिवसांत 517 मि. मी., तर सांताक्रुझ वेधशाळेच्या आकडेवारीनुसार 982.2 मिमी पाऊस पडला. ही सरासरी 550 मि. मी. इतकी आहे. यामध्ये अनेक वेळा समुद्रात भरती असल्याने मुंबईत 53 ठिकाणी पाणी तुंबल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
– अतिवृष्टीमुळे पालिकेच्या वेबसाइटवर पावसामुळे निर्माण झालेल्या 1916 तक्रारी तर 3593 फोन कॉल आपत्कालीन विभागात 1916 क्रमांकावर आल्याचे नोंदवण्यात आले. मात्र संबंधित विभागांना आदेश देऊन या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. साचलेले पाणी उपसण्यासाठी मुंबईभरात 1400 पंप कार्यान्वित होते अशी माहितीही पालिकेने दिली. हवामान खात्याच्या इशाऱयानंतर मध्यरात्री 1 वाजताच सर्व वॉर्डच्या सहायक आयुक्तांना आपापल्या विभागात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.
मोठी पडझड
– गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे पडझडीच्या घटनाही मोठय़ा प्रमाणात घडल्या. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात एकूण 54 ठिकाणी इमारतीचा भाग, भिंतीचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. मध्यरात्री 1 ते 2 या दोन तासांत तब्बल 250 मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाला.
– यामुळे शहरातील हिंदमाता, परळ, लालबाग, दादर टी. टी., सेनापती बापट मार्ग, शिवाजी पार्क, शीव सर्कल, रानडे रोड अशा ठिकाणी तर पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज वांद्रे (प.) व पूर्व उपनगरात पोस्टल कॉलनी, चेंबूर कॅम्प, महात्मा फुले नगर, शिंदेवाडी, इनलॅक हॉस्पिटल येथे पाणी भरले. संपूर्ण मुंबई दोन दिवसांत झाडे पडणे, फांद्या पडणे, शॉर्टसर्किट आणि घराचा भाग पडल्याच्या तब्बल 283 घटना घडल्या.
मृतांची नावे
शताब्दी रुग्णालय, कांदिवली – सरवन गौड (20), सानिका सुर्वे (14), जान्हवी कनोजिया (1), अनोळखी मुलगी (2), अनोळखी स्त्री (30), सीमा पैठणे (6), नमिता (28), किशोर शर्मा (60), अनोळखी पुरुष (40), अनोळखी स्त्री (22),
ट्रॉमा केअर सेंटर, जोगेश्वरी – सोनाली (19), सिद्धी (30), लक्ष्मण (40), परशुराम (3), दत्ता जाधव (50), मुन्नीदेवी पटेल (28), पालबीदेवी पटेल (2), 2 अनोळखी,
एम. व्ही. देसाई, मालाड – प्रमिला गौतम (2), मरीअम गौतम (4).
काशिमीरात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना काशिमीरा येथे घडली. हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने फ्रीजमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्याला स्पर्श करणाऱया राजनकुमार रविदास (19) आणि विरेंद्र भोईया (26) या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मीरा रोड परिसरातील प्लेझंट पार्क येथे स्पाईस ऍण्ड राईस नावाचे हॉटेल आहे. हॉटेल बंद झाल्यावर येथील कामगार नेहमीप्रमाणे टेबलावर झोपले होते. रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे हॉटेलमध्ये पाणी शिरले. यावेळी येथे झोपलेले राजनकुमार आणि विरेंद्र दोघेही किचनमध्ये गेले. यावेळी फ्रीजमध्ये पाण्याच्या प्रवाहाने शॉर्टसर्किट झाले.
जव्हारमध्ये काका-पुतण्या बुडाले
मुसळधार पावसामुळे आलेल्या सावळतोडी नदीच्या पुरात दाभालोन पैकी गुंजुनपाडय़ातील जाना उंबरसाडा (60) आणि काकड उंबरसाडा (40) हे काका-पुतण्या बुडाल्याची घटना जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुनपाडा येथे घडली. त्यांचे मृतदेह 13 कि.मी. अंतरावर सापडले. जाना हे शेताकडे गेले होते. मात्र त्यावेळी ते पुरात वाहून गेल्याचे पुतण्या काकड यांना समजले. त्यानंतर काकड हा काकाला शोधण्यासाठी नदीकडे गेला असता तोदेखील पुरात वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मुलुंडमध्ये भिंत कोसळून, तर विलेपार्ल्यात शॉक लागून दोघे ठार
मुलुंडच्या मॉडेला टाऊन येथील फाल्गुनी सोसायटीत सोमवारी रात्री दुर्घटना घडली. जोरदार पावसामुळे सोसायटीची संरक्षक भिंत पडल्याने इमारतीचा वॉचमन गंभीर करी सिंग (45) हा मातीच्या ढिगाऱयाखाली सापडला. गंभीर जखमी वॉचमनला मुलुंड पोलिसांनी ढिगाऱयाखालून बाहेर काढले व मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी गंभीर करी सिंगला मृत घोषित केले. दरम्यान, विलेपार्ले येथे देना बँकेच्या मुख्य गेटच्या येथे उघडय़ावर असलेल्या तारेचा शॉक लागून गोपाल झा (23) या तरुणाचा मृत्यू झाला.
मालाडमध्ये स्कॉर्पिओत दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे मालाड सब वे येथे पाणी साचल्याने त्यात एक स्कॉर्पिओ बुडाली. दुर्दैवाने त्या गाडीत असलेल्या इरफान खान (38) आणि गुलशाद शेख (40) यांना गाडीतून बाहेर पडता न आल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. पाण्यात स्कॉर्पिओ बुडाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना बाहेर काढले आणि कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता.
























































