
गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱया पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्यात आला. मात्र, आता कोरोनाचे संकट निवळल्याने आषाढी यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरातून मोठय़ा संख्येने वारकरी पंढरपुरात पोहोचत आहेत. त्या पार्श्वभूमीवर 4 ते 12 जुलै दरम्यान नगर जिह्यातून 220 बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.
दरवर्षी पंढरपूर यात्रेतून महामंडळाला मोठे आर्थिक उत्पन्न मिळत असते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे पंढरपूर वारी बंद होती. त्यामुळे महामंडळाचे हे उत्पन्न बुडाले. यंदा पंढरपूरला मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्याचा फायदा एस. टी. महामंडळालाही होणार आहे. त्यामुळे नगर जिह्यातून 220 बसेस सोडण्यात येणार आहेत. या आठ दिवसांत महामंडळाला सुमारे दीड ते पावणेदोन कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पंढरपूरकडून येणाऱया प्रवाशांची संख्या जास्त असते. 10 जूनला यात्रेचा मुख्य दिवस आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर भाविक परतीचा प्रवास एसटीनेच करतात. त्या पार्श्वभूमीवर बसची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आगारानुसार सोडण्यात येणाऱया जादा बसेस
अकोले 20, जामखेड 22, कोपरगाव 22, नेवासा 20, पारनेर 22, पाथर्डी 22, संगमनेर 22, शेवगाव 22, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 22, तारकपूर 25.


























































