अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू; शहापूरच्या जंगलात 23 जातींच्या पक्ष्यांची नोंद

शहापूर तालुक्यातील वनक्षेत्रात एकूण 23 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यात नदीसुरय, राखी धोबी, दलदली ससाणा या विशेष हिवाळी पाहुण्यांनी या भागात हजेरी लावली आहे. 23 पक्ष्यांमध्ये अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू आदींचा समावेश असून या भागात पक्षीप्रेमींची पावले वळू लागली आहेत.

वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि पद्मभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी निरीक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. वन्यजीव विभागातील खर्डी, वैतरणा परिसरात पसरलेले तानसा अभयारण्य तर शहापूर वनक्षेत्रातील धसई, शहापूर, डोळखांब, विहिगाव या वनपरिक्षेत्रात पक्षी निरीक्षण करण्यात येणार आहे. तानसा वन्यजीव विभाग, शहापूर वनविभाग आणि आउल कन्झर्वेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षीमित्र व वन्यजीव अभ्यासक रोहिदास डगळे, भूषण विशे, सागर वेहळे, प्रशांत शिराळ, भार्गव लाड, योगेश शिद, अक्षय गहरे या शहापूर तालुक्यातील पक्षीमित्रांनी खातीवली-वेहळोलीच्या पाझर तलाव परिसरात पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी विशेष हिवाळी पाहुणे नदीसुरय, राखी धोबी, दलदली ससाणा आढळून आले तर सामान्यपणे आपल्या भागात आढळणारे बगळे, पाणकावळा, राखी पाकोळी, अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, शिक्रा, कोतवाल, हळद्या, तिसा अशा विविध 23 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.