
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील सुमारे 233 विद्यार्थ्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालय आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयामध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
जागतिक नर्सिंग दिनानिमित्त या दोन्ही नामांकित संस्थांनी नुकतेच कृष्णा नर्सिंग महाविद्यालयामध्ये कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून 233 विद्यार्थी-विद्यार्थींनींची स्टाफ नर्स व नर्स एज्युकेटर या पदांसाठी निवड केली. जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्ससह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विविध नामांकित रुग्णालयांनी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफची भरती करण्यास प्रारंभ केला असून, तज्ज्ञ व कुशल स्टाफच्या नेमणुकीला प्राधान्य दिले जात आहे. याच उद्देशाने जागतिक नर्सिंग दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लिलावती रुग्णालय व संशोधन केंद्र आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्यावतीने कृष्णा नर्सिंग महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले होते.
कोरोना नियमांचे पालन करत या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम. नर्सिंगच्या च्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या 208, तर 55 माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींची अशी एकूण 263 जणांची मुलाखत घेण्यात आली. यापैकी 233 विद्यार्थी-विद्यार्थींनींची निवड करण्यात आली. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी लिलावती हॉस्पिटलच्या मनुष्यबळ व्यवस्थापक अपर्णा प्रभू, नर्सिंग सेवा विभागाच्या सहप्रमुख मृणाल वीरकर, कर्मचारी विकास विभागाच्या समन्वयक वैशाली वाघमारे, सुरक्षाप्रमुख विद्याधर पाटील प्रमुख उपस्थित होते. कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागाच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार, स्नेहा करमळकर, कनिष्ठ मनुष्यबळ अधिकारी श्रुती तावडे उपस्थित होत्या. याचबरोबर प्रा. मनिषा घोलप, लक्ष्मी नायर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर तेजस भोसले, स्वाती इंगळे, निशी पै उपस्थित होते.
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी 1983 साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी दरवर्षीची प्रवेश क्षमता अवघी 20 होती, जी आज 230 झाली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाल्याचे डॉ. वैशाली मोहिते, कृष्णा नर्सिंग अधिविभागाच्या अधिष्ठाता यांनी व्यक्त केले.. .

























































