
सामना प्रतिनिधी, उरण
जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर दररोज हजारो पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र मुंबईपासून जवळ असलेल्या या बेटावर सुरक्षेची कोणतीही मोठी तजवीज करण्यात आली नव्हती. परंतु आता 24 तास पोलिसांच्या खडय़ा पहाऱ्याबरोबरच टेहळणीसाठी उंच डोंगरावर चेकपोस्ट तयार केले जाणार असून रात्री उशिरा संशयितपणे फिरणाऱयांवर वॉच असणार आहे. त्यातच दोन महिन्यांपूर्वी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतल्याने पोलिसांसह आयबीचे अधिकारीही येथे ‘नजर’ ठेवणार आहेत. त्यामुळे स्थानिक व पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घारापुरी बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येत असतात. सुट्टय़ांमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असते. मात्र पर्यटकांना कोणतीही सुरक्षा पुरवली जात नव्हती. पर्यटकांना सुरक्षा आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे शासकीय विभागांचे दुर्लक्षच होत आहे. या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱयांची बैठक बोलावली होती. यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, इंडियन नेव्ही कोस्टगार्डचे अधिकारी श्रीवास्तव, इंटेलिजन ब्य़ुरो विभागाचे सहाय्यक संचालक दीपक ग्रोव्हर, न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल दामगुडे, सीआयएसएफचे डीसी आर. सी. यादव, आयबीचे निरीक्षक एस. चॅटर्जी, मेरिटाईम विभागाचे निरीक्षक नितीन कोळी, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
रात्री-अपरात्री अडकणाऱयांना दिलासा
घारापुरी बेटावर येताना पर्यटकांची मोजदाद होते. मात्र मुंबईकडे जाताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बऱयाच वेळा शेवटची प्रवासी बोट चुकल्यानंतर काही पर्यटक बेटावरच अडकून पडतात. त्यात एलिफंटा येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र यापुढे रात्री-अपरात्री बेटावर अडकणाऱया पर्यटकांना सुखरूप सोडण्यासंदर्भात बोटवाहक-मालकांबरोबर चर्चा केली जाणार आहे.


























































