फेसबुक व्हॉटसअ‍ॅपमुळे 2025 पर्यत 25 टक्के लोकांना मानसिक आजार होतील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा 

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपचे व्यसन माणसाला जडले, फेसबुक अ‍ॅडीक्शन, डिसऑर्डर, सेल्फीस्टीक असे नवीन मानसिक आजार उद्भवले आहे. 2025 पर्यंत जगभरातील 25 टक्के लोकांना मानसिक आजार होणार असल्याचे युनोच्या अभ्यासात आढळून आले आहे. म्हणून सोशल मीडियाचा विवेकी वापर चांगला पण विचारशून्य हाताळणी घातक असल्याचे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ, साहित्यिक तसेच प्रख्यात व्याख्याते अच्युत गोडबोले यानी पत्रकार परिषदेत सांगितले.

बुलढाणा येथे व्याख्यानासाठी आलेले अच्युतराव गोडबोले यांनी कार्यक्रमापूर्वी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, “प्रसिद्धी आणि पैसा याभोवतीच आजची पिढी भरकटलेली दिसत असल्याची वास्तविकता असून किती लाईक किंवा कमेंट मिळतात याची तुलना सुरु आहे. एखादा ईडली खात असल्याचे फोटो टाकतो. त्याच्या ईडली खाण्याचा आपल्याशी काय संबंध! पण अशा भंकस पोस्टलाही लाईक दिली जाते. आजी वारल्याची पोस्ट टाकल्यानंतरही 100 लाईक मिळत असतील तर याला काय म्हणावे. चांगले साहित्य आणि ज्ञान याच्या मागे लागण्याऐवजी क्षणभंगूर, चिल्लर विषयांभोवती तरुण गुरफटला आहे. अर्थात तंत्रज्ञानाला विरोध नाही. सोशल मीडियाने हरविलेली मुले भेटतील. जेष्ठ नागरिक एकत्रित आलेत, चळवळी वाढल्या. अण्णा हजारे, मी टू ही उदाहरणे आहे. परंतु फसवाफसवी, गैरप्रकारही वाढला.”

‘अतिशय घाईघाईने घेतलेला निर्णय’ असे वर्णन अर्थतज्ञ अच्युतराव गोडबोले यांनी नोटबंदीचे केले आहे. 8 नोव्हेंबर 2016  रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. हा निर्णय योग्य की अयोग्य? या प्रश्नावर आपले मत व्यक्त करताना गोडबोले म्हणाले की, कल्पना वाईट नव्हती परंतु क्रियान्वयन योग्य झाले नाही. मुळातच नोटांच्या रुपात काळा पैसा केवळ 6.8 टक्के आहे. तो प्रॉपर्टी, ज्वेलरीमध्ये गुंतविण्यात आलेला आहे. नोटबंदी केली आणि 2 हजार रुपयांची नोट बाजारात आणली. हा निर्णयही चुकला. यापेक्षा एक हजार रुपयांची नोट बंद करुन तेव्हढेच चलन 500 रुपयांच्या नोटांमध्ये परावर्तीत केले असते. एटीएमचा प्रोग्राम बदलणे फार कठीण नव्हते. एक दिवस आधीच या नोटा मशीनमध्ये पोहोचत्या केल्या असत्या. एकही माणूस रांगेत उभा नसता, नाही कुणी मेला असता. या शब्दात गोडबोले यांनी नोटबंदीच्या निर्णयांचे आपल्या परीने ऑपरेशन केले.