डोंगरीत कोट्यवधींचा बनावट केसरचा साठा जप्त; लाखो किमतीचे युरोदेखील हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

डोंगरी पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत दोन मोठय़ा कारवाया केल्या. केरळच्या दोघांना पकडून त्यांनी आणलेला जवळपास 250 किलो बनावट केसरचा साठा जप्त केला. शिवाय एकाकडून 35 हजार 500 युरोदेखील हस्तगत केले आहेत. डोंगरीतील एसटी इमारतीजवळ एक तरुण युरो घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी जाफर अब्बास हा तरुण तेथे येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता बॅगेत 35 हजार 500 युरो सापडले. या युरोची हिंदुस्थानी किंमत 32 लाख इतकी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. जाफर डोंगरीतील एका इमारतीत भाडय़ाने खोली घेऊन राहत होता. त्यामुळे पोलीस त्या खोलीची झडती घेण्यासाठी तेथे गेले असता खोलीत केसरचा साठा मिळाला. मग एफडीए पथकाच्या मदतीने तो केसरचा साठा जप्त करण्यात आला. परंतु ते केसर बनावट असून त्याची किंमत जवळपास सात कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी खोलीत असलेला अश्रुद्दीन इब्राहिम (32) हा सापडला. जाफर आणि अश्रुद्दीन दोघेही केरळचे असून डोंगरीत भाडय़ाने खोली घेऊन राहत होते.