अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार अंगणवाड्यांना टाळे लागले आहे. संपात साडेचार हजार अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी देवरूख येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाही देण्यात आल्या.
अतिशय जबाबदारीचे काम करणार्या मात्र अल्प मानधनात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या अंगणवाडी कर्मचार्यांनी फेब्रुवारी 2013 मध्ये अंगणवाडी कर्मचार्यांनी भरीव मानधन, मासिक पेन्शन या मुख्य मागण्यांसह अन्य काही मागण्यांसाठी संप केला होता. तो संप केवळ 9 दिवसांत मिटला. त्यावेळी शासनाने अंगणवाडी कर्मचार्यांना 1 हजार 500, 1 हजार 250 व एक हजार रुपये अशी मानधन वाढ 5 वर्षानंतर केली होती.
ही वाढ वाढत्या महागाईच्या मानाने फारच अल्प होती. मात्र अन्य मागण्यांबाबत शासन विचार करेल, या अनुषंगाने कृती समितीने ती मान्य केली होती. त्यावेळी शासनाच्या या निर्णयाने अंगणवाडी कर्मचारी अत्यंत निराश असून त्या आजही समाधानी नाहीत. पुढील पिढी घडविण्याचे अत्यंत महत्वाचे काम तसेच घरोघरी सर्वेक्षण करून शासनापर्यंत अतिशय महत्वाची माहिती पोहचविण्याचे काम या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन पुरेसे नाही. 40 ते 45 वर्षांच्या सेवेनंतर देखील शासनाकडून अंगणवाडी सेविकांबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यात येत आहे.