
‘पुन्हा शेतकरी कुटुंबात जन्म नको’ असे म्हणत सोलापुरातील सूरज जाधव या तरुण शेतकऱयाने विष पिऊन आत्महत्या केली. त्याचे वय अवघे 26 वर्षे होते. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडियो बनवला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने वाटय़ाला आलेले नैराश्य त्याने त्यात व्यक्त केले.
सूरज हा सोलापूरच्या मगरवाडी गावात राहत होता. आत्महत्येपूर्वी त्याने बनवलेला व्हिडियो हा सोशल मिडियावर व्हायरल झाला. बूच उघडून त्याने विषाची बाटली तोंडाला लावल्याचे त्यात दिसत होते. सूरज त्यानंतर बेशुध्द पडला. त्याला उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्याचा मृत्यू झाला. विष प्राशन करताना तो दारूच्या नशेत होता असे पोलिसांनी सांगितले. घर आणि शेतातील वीज तोडली गेल्याने तो निराश होता असे गावकरी सांगतात. मात्र गेली अनेक दिवस मगरवाडीत वीजपुरवठा कापला गेल्याची काहीच नोंद पोलिसांना सापडलेली नाही. सूरज याच्यावर कर्ज होते का या दिशेने आता तपास सुरू आहे.

























































