
सामना ऑनलाईन । मुंबई
नागपाडा परिसरातील पर्स, पेन्सिल, स्कूलबॅग बनविण्याच्या कारखान्यांमध्ये मजुरी करणाऱया 27 बालकांची गुन्हे शाखेच्या ‘जापू’ पथकाने आज सुटका केली. 8 ते 16 वयोगटातील ती मुले असून त्यांना तुटपुंज्या पगारावर मजुरी करायला लावणाऱया नऊ कारखाना मालकांना अटक केली आहे.
नागपाडा परिसरातील विविध कारखान्यांमध्ये बालकामगार असल्याची खबर ‘जापू’ शाखेला मिळाली. त्यानुसार एसीपी माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ, अंमलदार दीप्ती चव्हाण व पथकाने आज नागपाडय़ाच्या नयानगर परिसरात असलेल्या ममता इस्टेटमधील कारखान्यांवर छापेमारी केली तेव्हा काही मुले पर्सच्या कारखान्यात तर काही पेन्सिल, स्कूलबॅग, धागा कटिंगची कामे करताना दिसली. त्यात तीन मुले नेपाळची असून काही बिहार आणि यूपीची आहेत. त्या सर्व मुलांची मजुरीच्या दलदलीतून सुटका करून कारखान्याच्या मालकांना अटक केली आहे. सात जण फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.





























































