जतमध्ये उसाच्या शेतात गांजाची लागवड, 27 किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीला आला असून, या कारवाईत 2 लाख 57 हजार रुपयांचा 25 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उमदी पोलिसांनी ही कारवाई संयुक्तरीत्या केली आहे.

अंबादास शेशाप्पा तांबे (वय 40) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पांढरेवाडी येथील मुंजेवाडी येथे अंबादास तांबे याने उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व उमदी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्त पथकाने पांढरेवाडी येथील तांबे यांच्या उसाच्या शेतात छापा टाकला. या वेळी शेतात लहान-मोठी गांजाची झाडे मिळून आली. ती झाडे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केली. पंचनामा केला असता गांजाचे वजन 25 किलो 700 ग्रॅम इतके आढळले. या गांजाची किंमत दोन लाख 57 हजार रुपये होते. उमदी पोलिसांनी आरोपी अंबादास तांबे याला ताब्यात घेतले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, भगवान कोळी, संदीप पाटील, आमसिद्ध खोत, सिद्धेश्वर मोरे, हरिभाऊ खंडागळे यांनी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार तपास करीत आहेत.