
मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षादरम्यान देशभरात घरांची विक्रमी विक्री झाली आहे. मार्चपर्यंत तब्बल 3 कोटी 47 लाख एवढय़ा किमतीची घरे विकली गेली आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत घरांची विक्री 48 टक्क्यांनी वाढल्याचे रिअल इस्टेट सल्लागार एनारॉकने स्पष्ट केले आहे. घरांची निर्मितीही 36 टक्क्यांनी अधिक झाल्याचे एनारॉकने म्हटले आहे. सर्वाधिक घरांची विक्री पुण्यात झाली असून मुंबई देशभरात चौथ्या क्रमांकावर आहे.
मागील आर्थिक वर्षात विक्री झालेली घरे आणि त्यांची एकूण किंमत यात मुंबई महानगर क्षेत्र आघाडीवर आहे. एनारॉक ग्रुपचे संचालक अनुज पुरी यांनी सांगितले, ‘देशातील सर्वोत्तम हौसिंग मार्केटमध्ये विक्री झालेल्या एकूण घरांपैकी मुंबई महानगर क्षेत्राचा 30 टक्के वाटा आहे. मार्चपर्यंत वर्षभरात मुंबई क्षेत्रात एकूण 1 कोटी 67 लाखांच्या घरांची विक्री झाली. ग्राहकांनी केवळ राहण्यासाठीच नव्हे तर गुंतवणूक म्हणूनही घर खरेदी केले,’ असेही पुरी यांनी स्पष्ट केले.
जानेवारी-मार्चमध्ये मुंबईतील
घरांच्या किमतीत वाढ
जानेवारी-मार्चदरम्यान मुंबईतील घरांच्या किमती 5.5 टक्क्यांनी वाढल्या. याबाबतीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगभरातील टॉप 46 शहरांमध्ये सहाव्या स्थानी आहे. एक वर्षापूर्वी याचबाबतीत मुंबई 38 व्या स्थानी होती. रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रैंक इंडियानुसार मागील तिमाहीत घरांच्या किमती वाढल्याच्या बाबतीत जगभरात बंगळुरू शहर 16 व्या, दिल्ली 22 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही शहरे अनुक्रमे 37 आणि 39 व्या क्रमांकावर होती. घरांच्या वाढणाऱया किमतीबाबत दुबई सध्या आघाडीवर असून येथे घरांच्या किमती तब्बल 44.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सर्वाधिक घरांची
विक्री झालेली शहरे
पुणे 77 टक्के
हैद्राबाद 50 टक्के
बंगळुरू 49 टक्के
मुंबई एमएमआर 46 टक्के
दिल्ली एनसीआर 42 टक्के
कोलकाता 38 टक्के
चेन्नई 24 टक्के


























































