मुंबई पोलिसांच्या आठ तास डय़ुटीला तीन वर्षे पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

12हून अधिक तास कराव्या लागणाऱ्या कामाला ब्रेक लावत पोलीस अंमलदारांच्या सुरू झालेल्या आठ तास डय़ुटीला यशस्वी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. काही पोलीस ठाणी वगळता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आठ तास डय़ुटीचे काम सुरळीत सुरू आहे.

पोलिसांचे कामाचे तास, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम यामुळे पोलिसांची डय़ुटी आठ तासांची करा, अशी आग्रही मागणी पोलीस कुटुंबीयांची होती. या मागणीची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर देवनार, चेंबूर या पोलीस ठाण्यांत आठ तास डय़ुटीला सुरुवात केली. अंमलदार रवींद्र पाटील यांनी तयार केलेल्या अचूक आराखडय़ानुसार गणेशोत्सव व बकरा मंडी हे एकाच वेळेला असतानाही तेथे आठ तास डय़ुटी यशस्वी पार पडली. त्यामुळे आयुक्तांनी हळूहळू विविध पोलीस ठाण्यांत आठ तासांची डय़ुटी सुरू केली. 94पैकी 91 पोलीस ठाण्यांत आज आठ तासांची डय़ुटी सुरू असून त्याला रविवारी तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या आठ तास डय़ुटीतून प्रेरित होऊन रेल्वे पोलीस दलातही आठ तास डय़ुटी सुरू करण्यात येणार आहे.