
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहरातील पथदिव्यांच्या खासगीकरणाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. सुमारे 30 हजार नवीन एलईडी बसविणे व सात वर्षांसाठी त्याची देखभाल दुरुस्ती करणे, यासाठी महापालिकेकडून ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या चार महिन्यांत संपूर्ण शहर एलईडीमय होणार आहे.
तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यकाळात पथदिव्यांचे खासगीकरण करून शहर एलईडीमय करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या ईईएसएल या संस्थेच्या नावाने महासभेत ठरावही करण्यात आला होता. मात्र, सदर कंपनीकडून करण्यात आलेली वाढीव रकमेची मागणी मनपाकडून फेटाळण्यात आल्यामुळे हा प्रस्ताव रद्द झाला. त्यानंतर मालेगावच्या धर्तीवर शहरात प्रभाग समितीनिहाय चार संस्थांची नियुक्ती करण्याचाही विषय चर्चेत आला. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
नंतरच्या काळात माजी महापौर बाबासाहेब वाकळे व माजी उपमहापौर मालन ढोणे यांनी नव्याने पथदिव्यांच्या खासगीकरणाबाबत निर्णय घेतला. त्यासाठी काही संस्थांशी चर्चाही करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर यात दोन संस्थांच्या निविदा प्राप्त झाल्या. या निविदांचा वाद हायकोर्टापर्यंत गेला होता. त्यामुळे निविदांची प्रक्रिया रखडली होती. सध्याच्या महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी या विषयात लक्ष घालून पाठपुरावा केला. त्यातून अडचणींवर मात करत महापालिकेने अखेर हा प्रकल्प मार्गी लावला आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी सदर संस्थेला कार्यारंभ आदेश दिला आहे.
48 तासांत तक्रारींचे निरसन करावे लागणार; अन्यथा दंड
खासगी संस्थेमार्फत शहरातील संपूर्ण पथदिवे नव्याने बसविण्यात येणार आहेत. येत्या चार महिन्यांत ही प्रक्रिया पार पडणार आहे. मनपाकडून या संस्थेला नियंत्रण कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या जागेवर नियंत्रण कक्ष कार्यरत केला जाणार आहे. नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर 48 तासांत त्याचे निरसन करावे लागणार आहे; अन्यथा संस्थेवर दंडात्मक कारवाई होणार आहे. नागरिकांना सुविधेसाठी मोबाईल ऍपही विकसित केले जाणार आहे.
वीजबिलात 80 टक्क्यांपर्यंत बचत होणार
पथदिव्यांची दुरुस्ती, देखभाल व वीजबिलासह मानधनावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱयांचे पगार यासाठी महापालिकेला सध्या दरमहा 57 लाखांचा खर्च येत आहे. खासगीकरणातून एलईडी लावण्यात आल्यावर वीजबिलात 80 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. साधारणतः 10 ते 13 लाखांपर्यंत मनपाला वीजबिल येऊ शकते. कंपनीकडून नवीन पथदिवे बसविणे व देखभाल, दुरुस्ती केली जाणार आहे. त्यापोटी मनपा या कंपनीला दरमहा 43 लाख रुपये (जीएसटीसह) देणार आहे. त्यामुळे मनपाला या प्रकल्पापोटी अंदाजे 55 लाख दरमहा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती व चालू-बंद करण्याचे काम याच संस्थेकडून होणार असल्याने या कामासाठी वापरले जाणारे कर्मचारी आता इतर विभागात वापरले जाणार आहेत. सध्या लाखो रुपये खर्चूनही शहरातील जवळपास 30 ते 40 टक्के पथदिवे बंद आहेत. आता सध्या होत असलेल्या खर्चापेक्षाही कमी खर्चात संपूर्ण पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पथदिव्यांचे खासगीकरण करण्यात आले असले तरी या कंपनीकडून खांबांवर पथदिवे बसविले जाणार आहेत. तसेच देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. मात्र, खांब बसविणे व वायरिंग करून वीज प्रवाह उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेचीच असणार आहे.
आगामी चार महिन्यांत संपूर्ण शहरातील जुने पथदिवे काढून त्याजागी नवीन एलईडी बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील सात वर्षांसाठी याच संस्थेमार्फत पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती, तसेच पथदिवे चालू व बंद करण्याचे काम होणार आहे. एलईडीमुळे विजेच्या बिलात 80 टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, महापालिकेचीही मोठी आर्थिक बचत होणार आहे. शहरातील पथदिव्यांचा प्रश्न या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागेल.- शंकर गोरे, आयुक्त, नगर महापालिका.
























































