फसवून आणलेल्या बांगलादेशी महिलेची सांगलीत विक्री, चारजणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीच्या आमिषाने फसवून आणलेल्या एका 30 वर्षीय बांगलादेशी महिलेची वेश्याव्यवसायासाठी गोकुळनगरात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेला 30 जूनपासून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याचेही समोर आले असून, पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसांत धाव घेऊन चारजणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पीडित महिला ही बांगलादेशाची नागरिक आहे. तिने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयित राधा नामक महिला, महाभुरा भुया (रा. शेगरेहाट, ठाणा सोनारगंज, जिल्हा नारायणगंज, बांगलादेश), राजू आणि कालू नामक दोन व्यक्ती अशा चारजणांविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

महाभुरा भुया याने पीडित महिलेला मेडिकलसंदर्भात नोकरी देण्याचे आमिष दाखविले. महिन्याला 30 हजार रुपये पगार मिळेल, असे सांगून महिलेकडे कोणतीही कागदपत्रे नसतानाही तिला बांगलादेशातून हिंदुस्थानात आणले. त्यानंतर गोकुळनगरमध्ये आणून 40 हजार रुपयांना या महिलेची विक्री केली. त्यानंतर राधा नामक महिला, राजू आणि कालू नामक दोन व्यक्ती अशा तिघांनी वेश्याव्यवसाय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. 30 जून ते 15 जुलैपर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेची एकूण कैफियत समोर आल्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल  केला आहे.