तिसऱया लाटेत मुलांना सुरक्षा कवच, मुंबईतील 300 बालरोगतज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया संभाव्य लाटेत लहान मुलांनाही धोका जास्त असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे महापालिकेने मुंबईतील पालिका आणि खासगी बालरोगतज्ञांना प्रशिक्षण देणे सुरू केले असून आतापर्यंत 300 डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून एकूण तीन हजार डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांतील बालरोगतज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे, अशी माहिती पालिकेच्या ‘पेडियाट्रीक टास्क फोर्स’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख आणि शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असल्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा अधिक लवकर आणि सक्षमपणे दुसरी लाट नियंत्रणात आणली आहे. मुंबईत सध्या पॉझिटिव्हिटी रेट 5.56 टक्के असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 511 दिवसांवर पोहोचला आहे. असे असताना पालिकेने आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येणाऱया कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन मुंबईतील पालिका आणि खासगी बालरोगतज्ञांना प्रशिक्षण देणे सुरू केले असून आतापर्यंत 300 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. येत्या आठवडाभरात आणखी 500 डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे.

मुलांसाठी स्पेशल वॉर्ड

कोरोना झालेल्या अल्पवयीन मुलांवर पालिकेच्या रुग्णालयांत आधीपासून असलेल्या मुलांच्या वॉर्डमध्ये उपचार केले जाणार आहेत. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत मुलांसाठी 10 ते 15 बेड्स असलेले वॉर्ड असून मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये 100, नेस्कोमध्ये 100 ते 200 तर दहिसर जम्बोत 100 बेड कोरोनाबाधित लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर आणि आयसीयूची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.

ऑनलाइन-ऑफलाइन प्रशिक्षण

तिसऱया लाटेत संभाव्य लक्षणे आढळल्यानंतर करायच्या उपाययोजना-उपचार, पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास कुठे संपर्क साधावा, कुठल्या रुग्णालयात पाठवावे याबाबत बालरोगतज्ञांसह इतर डॉक्टरांनाही प्रत्येक वॉर्डनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.