31 डिसेंबर समीर वानखेडेंचा एनसीबीमध्ये शेवटचा दिवस?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा 31 डिसेंबर हा एनसीबीच्या सेवेतील अखेरचा दिवस ठरणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यांना याआधी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ 31 डिसेंबरला संपत असून त्यापुढे त्यांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीवरून अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याच्यावरील कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेले समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाल अवघ्या काही दिवसांचा उरला आहे. समीर वानखेडे यांनी खोटय़ा जात प्रमाणपत्रावर एनसीबीमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना जात पडताळणी समितीसमोरही हजर राहावे लागणार आहे. अशातच त्यांच्या एनसीबीतील सेवेबाबत एनसीबीतीलच अधिकारी बॅकफूटवर गेले आहेत. वानखेडे हे 2008च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून त्यांची 2020 साली एनसीबीमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली. सध्या ते एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक आहेत. याआधी त्यांना महसूल गुप्तचर संचालनालयावर नियुक्त करण्यात आले होते.

वानखेडे सुट्टीवर जाणार

  • एनसीबीत मुदतवाढ मिळण्याबाबत कोणतीही शक्यता नसल्याचे लक्षात आल्याने आता समीर वानखेडे हे सुट्टीवर जाण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते.  31 डिसेंबरनंतर मुदतवाढ न मिळाल्यास एनसीबीतील ही त्यांची शेवटची टर्म ठरू शकणार आहे.
  • सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनवरून रिया चक्रवर्ती, भारती सिंग, समीर खान, अरमान कोहली यांची चौकशी समीर वानखेडे यांनी केली होती. त्यांनी आतापर्यंत 324 आरोपींना अटक केली आहे.