
राज्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या 31 जिह्यातल्या 74 लाख 52 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. मदतीच्या संदर्भात मंत्रालयात आज मुख्य सचिवांच्या पातळीवर दिवसभर बैठका सुरू होत्या. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करायची यावर खल सुरु होता. पण मदतीच्या आकड्यांबाबत मदत–पुनर्वसन, कृषी व वित्त विभागाचे अधिकारी अनभिज्ञ होते. उद्याच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा स्पष्ट झाल्यावर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे सांगण्यात येत आहे.
एनडीआरएफचे निकष अपुरे पडणार
मदतीच्या संदर्भात मार्च 2023मध्ये सरकारने जीआर जारी केला होता. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या प्रचलित मदतीच्या दरानुसार कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी साडे आठ हजार रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रु., बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 22 हजार 500 रुपये दिली जाते. खरडून गेलेल्या पण दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी 18 हजार आणि खरडून गेलेल्या पण दुरुस्त न होऊ शकणाऱ्या किमान हेक्टरी पाच हजार आणि कमाल 47 हजार रुपयांची मदत दिली जाते. पण हा मदत एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. पण आताची अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता मदतीसाठी एनडीआरएफचे निकष अपुरे पडतील असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
सर्वाधिक फटका नांदेड जिह्याला
राज्यातील 36 जिह्यांपैकी 31 जिह्यांमधील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.सर्वाधिक फटका नांदेड जिह्याला बसला आहे. या जिह्यातील 7 लाख 28 हजार 024 हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. त्याखालोखाल अहिल्यानगरमधील 6 लाख 24 हजार 080 हेक्टर, बीडमध्ये 6 लाख हेक्टर, सोलापूर, 4 लाख 8 हजार 368 हेक्टर, जालना 3 लाख 83 हजार 783 हेक्टर, यवतमाळ 3 लाख 42 हजार 509 हेक्टर, धाराशीव 3 लाख 31 हजार 935 हेक्टर, वाशिम 2 लाख 5 हजार 812 हेक्टर, छत्रपती संभाजी नगर 1 लाख 68 हजार 300 हेक्टर, बुलडाणा 1 लाख 54 हजार 449 हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.
एकूण शेतकरी
47 लाख 52 हजार 559
40 लाख 49 हेक्टरवरील पिके बाधित
तब्बल 31 जिह्यांना फटका
एकूण बाधित जिल्हे – 31
एकूण बाधित तालुके – 197
प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र – 40 लाख 49 हजार 918 हेक्टर
10 हजार हेक्टरपेक्षा बाधित झालेल्या जिह्यांची संख्या – 17
सर्वाधिक पाऊस कालावधी – 5ऑगस्ट ते 27 सप्टेंबर 25
सर्वाधिक बाधित झालेली पिके – सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग