
वनविभागाच्या मालकीच्या असलेल्या तालुक्यातील वडगाव येथील जागेत खोदकाम करून मुरूम वाहून नेणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही चोरी करण्यासाठी वापरलेली वाहने व मुरूम असा मिळून 34 लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव येथील वनविभागाच्या मालकीच्या जागेतून मुरुमाची चोरी होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांना मिळाल्यानंतर साबळे यांच्यासह वनविभागाच्या पथकातील अप्पासाहेब घनवट, विजय पालवे, वर्षा गिते, सविता रायकर, मनीषा शिरसाठ, राजेंद्र आल्हाट, नारायण दराडे, सुधाकर घोडके, पांडुरंग हंडाळ हे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वडगाव येथे गेले असता त्यांना चार जण वनविभागाच्या जागेत एका जेसीबीच्या साहाय्याने मुरूम काढत असून तीन ट्रॅक्टर मुरूम वाहून नेत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी जेसीबी व तिन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही चोरी करणाऱ्या सुरेश बन्सी कावळे, भाऊसाहेब जगन्नाथ बडे, ज्ञानेश्वर आत्माराम गरड आणि परमेश्वर आत्माराम गरड सर्व रा. वडगाव यांच्या विरोधात भारतीय वनअधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.




























































