इराकमध्ये नदीखाली सापडले तब्बल 3400 वर्षांपूर्वीचे शहर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराकमध्ये नदीखाली तब्बल 3400 वर्षांपूर्वीचे शहर सापडले आहे. पुरातत्ववाद्यांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने इराकच्या कुर्दिस्तान भागात हे 3400 वर्षांपूर्वीचे शहर शोधले आहे. हजारो वर्षांपूर्वीचे हे शहर दिगरीत नदीखाली सापडले आहे. पुरातत्ववाद्यांनी नुकतीच या हजारो वर्षांपूर्वीच्या शहराची माहिती दिली आहे.

कुर्दिस्तान भागात टिगरीत नदीखाली 3400 वर्षापूर्वीच्या या शहराचे अवशेष सापडले. हे शहर मित्तानी साम्राज्यात इसवीसनपूर्व 1475 ते इसवीसनपूर्व 1275 दरम्यान वसवण्यात आले होते. टिगरीस नदीवरील मोसुल धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने या शहराचा शोध लागल्याचे पुरातत्ववाद्यांनी सांगितले. शहराच्या सापडलेल्या अवशेषांमध्ये विटांची आणि मातीची भिंत, काही बहुमजली इमारती, काही बंगले आढळले आहेत. तसेच इतर मोठ्या इमारतीही आढळल्या आहेत. त्यावरून हे शहर समृद्ध असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे मित्तानी साम्राज्यातील या शहराबाबतची उत्सुकता वाढली आहे. हे शहर एक व्यापार केंद्र असल्याचीही शक्यता आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पुरातत्वसंशोधक डॉ.इव्हाना पुलजीझ यांनी सांगितले की, या शहराच्या इमारती, घरे विचारपूर्वक बांधण्यात आली होती. काही ठिकाणी प्राचीन लिपीतील संदेशही आढळले आहेत. त्याची लिखाणाची विशेष शैली दिसून येत आहे. त्याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतरच त्याचा अर्थ समजू शकेल आणि हजारो वर्षापूर्वीच्या शहराची आणखी माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे हजारो वर्षे पाण्याखाली राहूनही या शहरातील घरे आणि इमारतीच्या विटा, भिंती सुस्थितीत आहेत. 1980 च्या सुमरास या परिसरात धरण बनवण्यात आल्याने हजारो वर्षांपर्वी लुप्त झालेले हे शहर पाण्याखाली गेले होते. मात्र, या वर्षी धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने या हजारो वर्षापूर्वीच्या शहराचा शोध लागला.

डिसेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठी कमी झाल्यावर शहराच्या एक भाग नजरेस पडला. त्यानंतर या भागात उत्खनन करून या प्राचीन शहराचा शोध लावण्यात आला आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू असून मित्तानी साम्राज्यातील या शहराबाबत अधिक माहिती मिळणार असल्याचे पुरातत्व संशोधकांनी सांगितले.