लॉकडाऊन काळात नोकरी गेल्याने झटपट पैशांसाठी यू ट्युब पाहून बनावट नोटा बनवणाऱ्य़ा तिघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. नदीम मोहंमद फासोपकर, आफताब मोहम्मद शेख आणि इम्रान शेख अशी त्या तिघांची नावे असून ते व्यवसायाने इंजिनीअर, हॉटेल मालक आहेत. त्या तिघांकडून वांद्रे पोलिसांनी 38 हजारांच्या नोटा जप्त केल्या असून त्या नोटा झोपडपट्ट्यांमध्ये वितरित करण्याचा त्या तिघांचा डाव वांद्रे पोलिसांनी हाणून पाडला.
वांद्रे पश्चिमच्या शास्त्रीनगर परिसरात काही जण बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर सहायक आयुक्त वसंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे, पोलीस निरीक्षक निकम, सहायक निरीक्षक फड यांच्या पथकातील पोलिसांनी शास्त्राrनगरजवळ सोमवारी रात्री फिल्डिंग लावली. फिल्डिंग लावून पोलिसांनी नदीम, आफताब आणि इम्रानला ताब्यात घेतले. त्या तिघांकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या 76 नोटा जप्त केल्या. नदीम हा कळवा येथे राहत असून तो एका हॉटेलचा मालक आहे. तर आफताब हा इंजिनीअर आणि इम्रान हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. लॉकडाऊनमध्ये नदीमचे हॉटेल बंद पडले तर आफताब आणि इम्रानची नोकरी गेल्याने त्या तिघांनी बनावट नोटा तयार करायचे ठरवले. यू ट्युबवर नोटा कशा बनवायचे हे पाहून इम्रान हा त्याच्या जोगेश्वरी येथील राहत्या घरी प्रिंटरच्या सहाय्याने नोटा बनवू लागला. नोटांसाठी लागणारे साहित्य आणण्याचे काम हा आफताब करत होता, तर बनावट नोटा या झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन वितरित करण्याचे काम हा नदीम करणार होता. काही महिन्यांपूर्वी त्या तिघांनी बनावट नोटा तयार करून त्या वितरित केल्या होत्या. बनावट नोटांप्रकरणी त्या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































