रायगड जिल्ह्यात वर्षभरात 39 खून, 35 गुन्ह्यांची पोलिसांनी केली उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेबर 2018 या दरम्यान 37 तर 13 डिसेंबर पर्यत 2 असे एकूण 39 खुनाचे गुन्हे घडले आहेत. खुन व हत्या झालेल्या 39 पैकी 35 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून 23 गुन्ह्यात आरोपीविरोधात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तर 16 गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खून व हत्येचे प्रमाण काही प्रमाणात वाढले असले तरी पोलिसांनी गुन्ह्याची उकलही केली असल्याने आरोपी गजाआड झाले आहेत.

कुटूंबात वाद, मालमत्तेवरून वाद, भावंडात तंटा, प्रेम प्रकरण, पती पत्नीत वाद, राजकीय वैर अशा अनेक कारणांमुळे खून व हत्येचे गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत. माणूस रागाच्या भरात आपले नाते, मैत्री, प्रेम विसरून आपल्याच माणसाला ठार मारण्यासाठी धजावत नाही. रागाच्या भरात तसेच प्लॅन करून एखाद्या व्यक्तीचा काटा काढला जातो.

गुन्हा केल्यानंतर आपल्याला कोणी पाहिले नाही, काही पुरावा राहिला नाही ना याची खबरदारी गुन्हेगार घेत असतो. मात्र कानून के हाथ लंबे होते है या म्हणीप्रमाणे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेमधून सुटत नाही. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2018 पर्यत 39 खून व हत्येचे गुन्हे घडले आहेत. 34 गुन्ह्याचा तपासही जिल्हा पोलिसांनी त्वरित लावला असून आरोपीना जेरबंद केले आहे. तर 23 गुन्ह्यात पोलिसांनी दोषारोपही दाखल केले आहे.

जिल्ह्यात खून, हत्येच्या गुन्ह्यात वाढ झालेली असून माणसामधली माणुसकी कमी होत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. खून, हत्या हे गुन्हे सोडले तर इतर गुन्ह्याबाबत पोलीस दक्षता घेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र खून, हत्या यासारख्या गुन्ह्यात दक्षता घेणे कठीण असते. कारण हे गुन्हे घडणार कधी व कसे याबाबत कोणतीच कल्पना कोणालाच नसते. त्यामुळे असे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हा करणाऱ्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

पोलीस ठाणे निहाय 302 चे गुन्हे
रसायनी 2, खालापूर 3, खोपोली 2, कर्जत 4, नेरळ 1, माथेरान 0, पेण 1, दादर सागरी 1, वडखळ 0, पोयनाड 0, मांडवा 3, अलिबाग 3, रेवदंडा 3, पाली 1, मुरुड 2, रोहा 1, कोलाड 0, नागोठणे 1, माणगाव 3 , गोरेगाव 0, तळा 0, महाड शहर 2, महाड तालुका 0, एमआयडीसी 2, पोलादपूर 0, म्हसळा 1, श्रीवर्धन 1, दिघी सागरी 2