पावणे चार हजार ऊस तोडणी कामगार घरी परतले; गावात 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन

588

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अन्य ठिकाणी जिल्ह्यातील साडेचार हजार ऊस तोडणी कामगार गेल्या महिनाभरापासून अडकले होते. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्यानंतर राज्यातील विविध भागातून 3 हजार 648 ऊस तोडणी कामगारांना नगर जिल्ह्यात दाखल करून घेण्यात आले आहे.

नगर, बीड या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी मजूर जात असतात. साधारणपणे राज्यात मार्च महिन्यांपासून गाळप हंगाम आटोपण्यास सुरूवात होते. मात्र, यंदा 20 मार्चनंतर राज्यातील विविध जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनचा फटका ऊसतोडणी कामगारांना बसला. पोटापाण्यासाठी जिल्हा सोडून अन्यत्र गेलेले हे कामगार बायका पोरांसह जिल्ह्यात अडकून पडले. त्यामुळे सरकारने आदेश काढत या ऊसतोडणी कामगारांसाठी संबंधीत कारखान्यांने निवारागृह सुरू करून त्यांना ठिकाणी ठेवण्यास सांगितले. मात्र, महिनाभरानंतर लॉकडाऊन मागे घेण्याची शक्यता नसल्याने आणि करोनाचा प्रकोप वाढत असल्याने अखेर राज्य सरकारने निर्णय घेतल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे ऊसतोडणी कामगार त्यांच्या जिल्ह्यात परतत आहेत.

जिल्ह्यातील 4 हजार 460 ऊस तोडणी कामगार अन्य जिल्ह्यात अडकले होते. या सर्वांना आता जिल्ह्यात प्रवेश मिळण्यास सुरूवात झाली. जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाल्यावर संबंधीत गावात पोहचल्यावर त्या ठिकाणी सरपंच यांच्या दाखल्यानुसार या कामगारांना गावातील प्राथमिक शाळेत 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यांनतर संबंधीतांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहेत.

असे आहेत जिल्ह्यात दाखल कामगार
जामखेड 713, शेवगाव 506, पाथर्डी 1935, नगर 118, राहुरी 105, कर्जत 26, नेवासा 144, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 21, राहाता 12, संगमनेर 39, कोपरगाव 5, अकोले 7, पारनेर 9 एकूण 3648 आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या