
कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांपासून अभ्यासक- संशोधक अशा सर्वांनाच उपयुक्त ठरेल, अशा संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ‘साहित्यवेदी’ असे या संकेतस्थळाचे नाव आहे. डॉ. सुजाता शेणई, प्रा. शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद आणि प्रा. नानासाहेब जामदार अशी या चार शिक्षकांची नावे आहेत.
‘साहित्यवेदी’ या संकेतस्थळाचे अनावरण मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरुवारी झाले. मराठी भाषा अध्यापकांनी एकत्र येऊन केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मराठी भाषेच्या भरजरी सेंदर्याचे सात्विक रुपडे पुन्हा सजवावे, या प्रबळ इच्छेतून साहित्यवेदी संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे. लहान मुले, संशोधक- अभ्यासक, अगदी सामान्य माणसाला समजेल असा माहितीचा खजिना साहित्यवेदीवर उपलब्ध आहे. त्यामध्ये कोश, बोलीचे बोल, कहाणी शब्दांची, सुलेखनकार, नियतकालिके, युवासाहित्यकार, ग्रंथगंगा, साहित्य परिक्रमा असे विभाग करण्यात आले आहेत.
संकेतस्थळाची वैशिष्टय़े
लहान मुलांसाठी कोश, शब्दकोशाचा खजिना, सामान्य वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी विविध लेख.
मराठी भाषेला 52 बोली आहेत. भाषा आणि बोलीत काय फरक त्यांचे नमुने व्हिडीओच्या माध्यमातून संकेतस्थळावर उपलब्ध.
ग्रंथालयांची माहिती, ग्रंथालयात किती पुस्तके, वेळ, संपर्प क्रमांक आदी.
साहित्य परिक्रमा- आपण खूप फिरत असतो. पण हे फिरणे साहित्याच्या अंगाने व्हावे, या उद्देशाने साहित्य परिक्रमा हा विभाग आहे. केशवसुतांचे मालगुंड निवासस्थान, नाशिकचे पुसुमाग्रज प्रतिष्ठान, आक्षीचा शिलालेख अशा अनेक स्थळांची माहिती, फोटो, क्हिडीओ संकेतस्थळावर बघता येतील.
मराठीत 820 कोश आहेत. त्यातील काही निवडक लिंक ‘साहित्यवेदी’ संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.
‘ओंजळ’ अॅपला 12 हजार डाऊनलोड
याआधी उच्च माध्यमिकच्या सहा अभ्यासगट शिक्षकांनी बारावीच्या पाठय़पुस्तकावर आधारित ‘ओंजळ’ या अॅपची निर्मिती केली आहे. या विनामूल्य अॅपला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘ओंजळ’ला 12 हजार 171 डाऊनलोड असल्याचे डॉ. सुजाता शेणई यांनी सांगितले.
दरवर्षी कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन होतो. एक दिवस आणि त्यातही त्या दिवसाचे काही तास तुम्ही मुलांना काय देणार, असा प्रश्न आम्हा शिक्षकांना पडतो. वर्षाचे 365 दिवस मराठी भाषेची थोरवी दृष्टिक्षेपात रहावी आणि भाषेचे शिक्षक म्हणून मुलांपर्यंत पोचावे, या उद्देशाने संकेतस्थळ हे माध्यम निवडले. ‘साहित्यवेदी’साठी शालेय स्तर ते संशोधक -अभ्यासक हा एवढा व्याप्त स्तर निवडलाय. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा शिक्षक म्हणून थोडं तरी उतराई होण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
– डॉ. सुजाता शेणई


























































