
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे 4 जणांना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे, प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी अशा एकूण 9 जणांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 22 नागरिक आणि श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात 4 जणांनाविलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेज येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षांची महिला व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 32 वर्षांचा पुरुष या दोघांचा मृत्यू श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

























































