
राज्यातील मच्छिमारांना डिझेल परताव्यापोटी 40 कोटी 65 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने 2020 व 2021 या आर्थिक वर्षात डिझेलवरील मूल्यवर्धित कर प्रतिपूर्तीसाठी 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना त्यातील फक्त 19 कोटी 35 लाख रुपयांची रक्कमच मत्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आली होती.
मच्छिमारांना दिलासा देण्यासाठी उर्वरीत 40 कोटी 65 लाख रुपयांची डिझेल परताव्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्यासाठी राज्याचे मत्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. मध्यंतरी अजित पवार यांच्या दालनात अस्लम शेख व मच्छिमार नेत्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली होती.
40 कोटी 65 लाख रुपयांचा डिझेल परताव्याच्या वितरणास वित्त विभागाची मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात डिझेल परताव्याचा अनुशेष वाढत गेला. हा अनुशेष भरुन काढत चालू वर्षात 60 कोटी रुपयांपर्यंत डिझेल परतावा मच्छीमारांना देण्यात आलेला आहे. उर्वरीत डिझेल परताव्यासाठी पुरक मागणी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सध्या 160 मच्छीमार सहकारी संस्थांच्या 9646 यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्यात आलेला आहे
जिल्हानिहाय डिझेल परताव्याची रक्कम
पालघर- 4 कोटी 50 लाख रु, ठाणे- 5 कोटी 80 लाख रु, मुंबई उपनगर 7 कोटी 11 लाख रु, मुंबई शहर 5 कोटी 80 लाख रु. रायगड 5 कोटी 80 लाख रु. रत्नागिरी 7 कोटी 15 लाख रु. सिंधुदुर्ग 4 कोटी 20 लाख रु.
































































