सोलापुरातील 41 टक्के नागरिक लसीविनाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष झाले. सोलापूर शहरात 89 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर, दोन्ही डोस घेतलेले 59 टक्के वयस्क नागरिक आहेत. सोलापूर शहरात 7 लाख 34 हजार जणांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने ठेवले होते. त्यापैकी 6 लाख 11 हजार 439 जणांना पहिला डोस मिळाला आहे. तब्बल 41 टक्के नागरिकांचे अजून दोन्ही डोस टोचून व्हायचे आहेत.

लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेला नागरिकांच्या प्रतिसादाचे चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. संसर्गाच्या दुसऱया लाटेच्या धास्तीने लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या. त्यावेळी आरोग्य यंत्रणेला सरकारकडून लसीचा पुरवठा कमी पडत होता. त्यात काही दिवस तर लसीचा साठा येतच नव्हता. नंतर हळूहळू लसीचा पुरवठा सामान्य झाला. सध्या प्रशासनाकडे कोविशिल्डच्या 3 लाख 34 हजार 660 तर कोव्हॅक्सिनच्या 25 हजार 865 डोस शिल्लक आहेत.

आता दररोज केंद्रावर सरासरी 35 हजार नागरिकांना लस दिली जात आहे. कमी मनुष्यबळ असतानाही आरोग्य यंत्रणेने जिह्यात एकूण 47 लाख 50 हजार 640 लसींच्या मात्रा नागरिकांना दिल्या. विविध वयोगटातील 29 लाख 44 हजार 546 नागरिकांनी पहिला, तर 18 लाख 6 हजार 546 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 1011 कर्मचाऱयांना लस दिली. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात वयस्कर नागरिकांना लस देणे सुरू झाले. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात सर्वत्र लसीची मागणी होत असल्याने सोलापूर मागणीच्या तुलनेत लस मिळत नव्हती. लसीचा पुरवठा सामान्य झाल्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जास्त लसीकरण झाले. त्यानंतर डिसेंबरमध्ये पहिला व दुसरा डोस मिळून 11 लाख लसीची मात्रा दिली गेली. तिसरी लाट व सेवांवरील निर्बंधांमुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले. 3 जानेवारीपासून किशोरवयीन मुलांना लस देणे सुरू झाले. 55 हजार 472 किशोरवयीन मुलांचे लसीकरण झाले. सोलापूर जिह्यात पुढच्या दोन महिन्यांत 2 लाख 26 हजार किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

लसीकरण वाढवण्यासाठी उपक्रम घेतले. डिसेंबरमध्ये सगळ्यात जास्त लसीकरण झाले. लसीकरणास गती देण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त विशेष मोहीम, कुपोषित बालकांच्या माता, फिरते लसीकरण, मिशन कवचकुंडल, मिशन युवा स्वास्थ्य, हर घर दस्तक, एक दिवस एक लक्ष, गरोदर माता लसीकरण करण्यावर भर दिला आहे.
– डॉ. अनिरुद्ध पिंपळे,लसीकरण समन्वयक.

सोलापूर जिह्यात अजूनही साडेचार लाख नागरिकांनी लस घेतली नाही. 85 टक्के नागरिकांनी पहिला डोस, तर 50 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. नागरिकांनी लस घेऊन स्वतŠला सुरक्षित करण्यावर भर द्यावा. किशोरवयीन मुलांनाही लस देऊन त्यांना सुरक्षित केले पािहजे. लस घेतल्याने संसर्ग जरी झाला तरी व्यक्ती गंभीर होत नाही.
– मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी