
सामना प्रतिनिधी । नगर
महापालिका निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी 41 मतदान केंद्र हे अतीसंवेदनशील तर 134 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही मतदान केंद्र असून यासर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी एकूण 337 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या अकरा इमारतींमधील मतदान केंद्र संवेदनशील तर दहा इमारतींमधील केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणार्या 13 इमारतींमधील मतदान केंद्र संवेदनशील व एका इमारतीमधील केंद्र अतिसंवेदनशील आहे. तर, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणार्या चार इमारतींमधील केंद्र ही संवेदनशील आहेत. या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार्या एकूण 36 इमारतींमध्ये 134 संवेदनशील व 41 अतिसंवेदनशील केंद्र आहेत. यासर्व केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.




























































