हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यामुळे विमानांचे तिकीट दर वाढले, तिकीटं 415 टक्क्यांनी महागली

आयसीसी वन डे वर्ल्डकप सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. यंदाचा वर्ल्डकप हिंदुस्थानमध्ये रंगणार असून 5 ऑक्टोबर रोजी पहिला तर 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. दर चार वर्षांनी होणाऱ्या वन डे वर्ल्डकपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी आतूर असणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या खिशाला मात्र चांगलाच दणका बसणार आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात उत्कंठावर्धक सामना हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे रंगणार आहे. या लढतीची क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र हा सामना पाहण्यासाठी अहमदाबाद येथे पोहचण्यासाठी क्रीडाप्रेमींना खिसा रिकामा करावा लागत आहे. एकीकडे अहमदाबाद येथील हॉटेलच्या रुमच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना दुसरीकडे विमानांची तिकीटंही महागली आहेत. देशभरातून अहमदाबादकडे येणाऱ्या विमानांच्या भाड्यामध्ये तब्बल 104 ते 415 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील सामन्याला अद्याप 25 दिवस बाकी आहेत. 14 ऑक्टोबरला होणाऱ्या हा सामना पाहण्यासाठी तुम्ही आज विमानाचं तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. चंदीगड, जयपूर, लखनौ, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पाटणा, भोपाळ, भुवनेश्वर आणि पुणे यासारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीटांसाठी प्रचंड पैसे मोजावे लागत आहेत. हा सामना पाहण्यासाठी अनेकांनी योजना आखली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे टॅगचे (Travel Agents and Tour Operators’ Association of Gujarat) अध्यक्ष अनुज पाठक म्हणाले.

दरम्यान, अहमदाबादमध्ये वर्ल्डकपचे चार सामने खेळले जाणार आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान हा रोमहर्षक सामना आणि अंतिम सामनाही अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. यासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी येथे येतील. त्यामुळे विमानांच्या तिकीट दरांसह हॉटेलचे रुम भाडेही वाढले आहे. अहमदाबादमध्ये एका रुमसाठी तब्बल 80 हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रायोजक, क्रीडाप्रेमी आणि व्हीव्हीआयपींनी आधीपासून हॉटेल्स बुक केले आहेत. त्यामुळे आगामी काळात अहमदाबादमधील हॉस्लिटॅलिटी क्षेत्राला कमाईची चांगली संधी असल्याचे आयटीसी नर्मदाचे जनरल मॅनेजर कीनने मॅकेन्झी (Keenan McKenzie) म्हणाले.

विमानांचे तिकीट दर आधी आणि आता

चंदीगड – आधी 8500, तर आता 43,833 रुपये मोजावे लागत आहेत. (415 टक्के वाढ)
जयपूर – आधी 8000, तर आता 31682 रुपये मोजावे लागत आहेत. (296 टक्के वाढ)
लखनौ – आधी 10000, तर आता 37457 रुपये मोजावे लागत आहेत. (274 टक्के वाढ)
दिल्ली – आधी 7500 तर आता 24,258 रुपये मोजावे लागत आहेत. (223 टक्के वाढ)
कोलकाता – आधी 13000, तर आता 33,201 रुपये मोजावे लागत आहेत. (155 टक्के वाढ)
मुंबई – आधी 5500, तर आता 16785 रुपये मोजावे लागत आहेत. (205 टक्के वाढ)
चेन्नई – आधी 12000, तर आता 29,333 रुपये मोजावे लागत आहेत. (144 टक्के वाढ)